Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाळूच्या वादळाचे राजस्थानात थैमान; ताशी ७० किमी वेगाचा झंझावात, विजेचे खांबही पडले, भरदुपारी अंधार

वाळूच्या वादळाचे राजस्थानात थैमान; ताशी ७० किमी वेगाचा झंझावात, विजेचे खांबही पडले, भरदुपारी अंधार

यपूर : राजस्थानच्या पाच जिल्ह्यांमध्ये वाळूच्या वादळाने शनिवारी थैमान घातले. ताशी ७० किमी वेगाने घोंघावणाऱ्या या वादळाने भरदुपारी अंधार दाटला. यामुळे नागरिकांना घरातच बसावे लागले.

समोरचे काही दिसेनासे झाल्याने रस्त्यावरील वाहनांची वाहतूक थांबवावी लागली.

श्रीगंगानगर, बिकानेर, चुरू, हनुमानगड आणि सीकर या ५ जिल्ह्यांमध्ये शनिवारी दुपारी प्रचंड धुळीचे वादळ आले. यामुळे सुमारे २०० चौरस किमीचा परिसर प्रभावित झाला. या काळात ताशी ६० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहिले. या धुळीच्या वादळामुळे भरदुपारीच सर्वत्र अंधारून आले होते. या अंधाऱ्या वातावरणामुळे लोकांना दिवसाच आपल्या वाहनांचे दिवे सुरू करावे लागले. लोक जीव वाचवण्यासाठी घरांकडे पळताना आणि घरांची दारे-खिडक्या बंद करताना दिसत होते.

वादळाच्या तडाख्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही तुटले आहेत. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या वादळामुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

१०० फूट उंच धुळीचे डोंगर

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, त्यांनी असे धुळीचे वादळ यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. अनेक ठिकाणी धुळीच्या लोटांमुळे ८० ते १०० फूट उंचीचे डोंगर उभे राहिले. अवघ्या काही मिनिटांमध्ये या वादळाने सर्व परिसराचा कब्जा घेतला.

पावसाचे ४८ बळी

लखनौ : उत्तर भारतात हवामानाचा कहर सतत सुरू आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये जोरदार वादळ, मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये वादळी वारे व पावसाचे गेल्या तीन दिवसांमध्ये ४८ बळी गेले आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये नदीला अचानक आलेल्या पुरामुळे गाड्या वाहून गेल्या, तर आग्यात वादळ आणि पावसाशी संबंधित अपघातांमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti