Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वारंवार Acidity होतेय? 'ही' लक्षणे असतील तर वेळीच सावध व्हा

वारंवार Acidity होतेय? 'ही' लक्षणे असतील तर वेळीच सावध व्हा

जेवल्यानंतर पोट जड होणे, वारंवार पोट फुगणे किंवा छातीत जळजळ होणे याकडे अनेकदा 'ॲसिडिटी' म्हणून दुर्लक्ष केले जाते. अधूनमधून होणारा पचनाचा त्रास सामान्य असू शकतो. मात्र, ही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर त्यामागे केवळ ॲसिडिटी नसून पोटाशी संबंधित दुसरी समस्या असण्याची शक्यता असते.

त्यामुळे वारंवार होणाऱ्या या त्रासाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ॲसिडिटी म्हणजे काय?

ॲसिडिटीला सामान्यतः ॲसिड रिफ्लक्स किंवा हार्टबर्नशी जोडले जाते. पोटातील आम्ल किंवा अन्न पुन्हा अन्ननलिकेकडे वर आल्याने जळजळ होते. छातीत किंवा घशात जळजळ, तोंडात आंबट-कडू चव, वारंवार ढेकर येणे आणि जेवल्यानंतर पोट जड वाटणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. जास्त जेवणे किंवा जेवल्यानंतर लगेच झोपल्याने हा त्रास वाढू शकतो.

ताप-खोकला असताना काय खाल? तज्ज्ञांच्या मते 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

अपचनाची लक्षणे कोणती?

तज्ज्ञांचे मते, अपचन हा एक स्वतंत्र आजार नसून पचनाशी संबंधित अनेक त्रासांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. पोट फुगणे, पोटाच्या वरच्या भागात दुखणे किंवा जळजळ होणे, मळमळ, वारंवार ढेकर येणे, भूक कमी होणे आणि थोडेसे जेवल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. ॲसिडिटीमध्ये मुख्यतः पोटातील आम्ल वर येण्यामुळे त्रास होतो, तर अपचनामध्ये पचनसंस्थेच्या वरच्या भागात वेगवेगळ्या प्रकारची अस्वस्थता जाणवते.

गॅस्ट्रोपेरेसिस म्हणजे काय?

गॅस्ट्रोपेरेसिस ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये पोटातील अन्न नेहमीपेक्षा हळूहळू पुढे सरकते. पोटाच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या स्नायू आणि नसांचे कार्य बिघडल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. पोटात अन्न पुढे जाण्यास कोणताही अडथळा नसतानाही ते उशिराने रिकामे होते.

ॲसिडिटी आणि गॅस्ट्रोपेरेसिसमध्ये फरक

ॲसिडिटीमध्ये पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येणे हे मुख्य कारण असते. अपचनामध्ये पचनाच्या वेळी पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता जाणवते. गॅस्ट्रोपेरेसिसमध्ये मात्र पोटातून अन्न पुढे जाण्याची प्रक्रिया मंदावते.

गॅस्ट्रोपेरेसिसचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे थोडेसे जेवल्यानंतरही लगेच पोट भरल्यासारखे वाटणे. भूक असूनही व्यक्तीला पूर्ण जेवण करता येत नाही. मागील जेवण अनेक तासांनंतरही पोटातच असल्यासारखे वाटू शकते. मळमळ, उलट्या, पोट फुगणे, पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता, भूक कमी होणे आणि हार्टबर्न यांसारखी लक्षणेही दिसू शकतात.

गॅस्ट्रोपेरेसिसची कारणे

मधुमेह हे गॅस्ट्रोपेरेसिसचे एक महत्त्वाचे कारण आहे. रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास पोटाच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम होऊ शकतो. काही शस्त्रक्रियांनंतर किंवा काही न्यूरोलॉजिकल आजारांमध्येही ही समस्या उद्भवू शकते. मात्र, अनेक रुग्णांमध्ये याचे नेमके कारण समजू शकत नाही.

सतत थकवा अन् विनाकारण वजन कमी होतंय? शरीराच्या 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

स्वतःहून निदान करू नका

ॲसिडिटी, अपचन आणि गॅस्ट्रोपेरेसिसची अनेक लक्षणे सारखी असल्याने वारंवार होणारा त्रास केवळ ॲसिडिटीमुळे आहे, असे समजण्याची शक्यता असते. अँटॅसिड घेतल्याने जळजळ काही काळ कमी होऊ शकते. मात्र, पोट रिकामे होण्यास विलंब हे मूळ कारण असेल तर केवळ अँटॅसिडने समस्या दूर होणार नाही.

डॉक्टर रुग्णाला त्रास नेमका कधी होतो, किती अन्न खाल्ल्यानंतर होतो, उलट्या होतात का, वजन कमी झाले आहे का आणि इतर कोणते आजार आहेत, याची माहिती घेतात.

गॅस्ट्रोपेरेसिसचे निदान कसे होते?

गॅस्ट्रोपेरेसिसचा संशय असल्यास डॉक्टर अपर जीआय एंडोस्कोपी आणि इतर आवश्यक चाचण्या सुचवू शकतात. या तपासण्यांद्वारे पोटातील अन्न किती वेगाने पुढे जाते, तसेच यासारखी लक्षणे निर्माण करणाऱ्या इतर समस्या आहेत का, हे तपासले जाते. निदान झाल्यानंतर लक्षणांची तीव्रता आणि कारणानुसार उपचार ठरवले जातात.

Throbbing Headache : डोकं ठणकतंय? 'ही' असू शकतात कारणं; जाणून घ्या उपाय

उपचार आणि आहारात बदल

रुग्णाच्या स्थितीनुसार उपचार केले जातात. आहारात बदल करून कमी प्रमाणात आणि वारंवार जेवण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. इतर आजारांवर, विशेषतः रक्तातील साखरेवर योग्य नियंत्रण ठेवणेही महत्त्वाचे ठरते.

या उपायांनी फायदा न झाल्यास काही रुग्णांसाठी Gastric Per-Oral Endoscopic Myotomy (G-POEM) ही विशेष प्रक्रिया विचारात घेतली जाऊ शकते. मात्र, उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करणे आवश्यक आहे.

'ही' लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

अधूनमधून पोट फुगणे किंवा अपचन होणे सामान्य असू शकते. मात्र, वारंवार उलट्या होणे, कारण नसताना वजन कमी होणे, अन्न खाता न येणे, सतत मळमळ होणे किंवा थोडेसे जेवल्यानंतरही वारंवार पोट भरल्यासारखे वाटणे याकडे दुर्लक्ष करू नका.

कधी कधी साधी ॲसिडिटी वाटणारी लक्षणे ही पोटातून अन्न पुढे जाण्याच्या प्रक्रियेत अडथळा असल्याचे संकेत देऊ शकतात. त्यामुळे वारंवार होणाऱ्या त्रासाचे स्वतःहून निदान करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti