Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Weather Update : मान्सूनची आगेकूच सुरूच, केरळातील तारीख मात्र हुकली

Weather Update : मान्सूनची आगेकूच सुरूच, केरळातील तारीख मात्र हुकली

वी दिल्ली : केरळमधील मान्सूनच्या आगमनाची अपेक्षित तारीख (२६ मे) हुकली असली, तरी नैर्ऋत्य मान्सून काही भागांत, लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने बुधवारी दिली.

हवामान विभागाने यापूर्वी २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता, ज्यामध्ये अधिक किंवा उणे ४ दिवसांचा फरक गृहीत धरण्यात आला होता. सामान्यतः मान्सून १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. या आगमनानेच देशातील अधिकृत मान्सून हंगामाची (जून ते सप्टेंबर) सुरुवात होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २४ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. हवामान विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या २ ते ३ दिवसांत नैर्ऋत्य मान्सून नैर्ऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, लक्षद्वीप, पूर्व-मध्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांत आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे."

मुंबई आणि परिसराला 'यलो अलर्ट'

भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी 'उष्णतेच्या लाटेचा' इशारा देत 'यलो अलर्ट' जारी केला आहे. हा इशारा गुरुवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत लागू असेल, त्यानंतर या भागात हवामान 'उष्ण आणि दमट' राहील.

इतर भागांत पावसाचा इशारा

मुंबईत उन्हाचा कडाका असला, तरी या आठवड्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्राचा समावेश आहे.

मुंबईत उच्चांकी तापमान

मुंबईत सध्या उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून बुधवारी कुलाबा वेधशाळेत ३७.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या १० वर्षांतील मे महिन्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले आहे. तसेच किमान तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा अधिक होते. यापूर्वी गेल्या दशकभरात १६ मे २०२४ रोजी मे महिन्यातील दुसऱ्या सर्वोच्च तापमानाची (३७.६ अंश सेल्सिअस) नोंद झाली होती.दरम्यान, मुंबईकरांना पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान खात्याने आधी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला होता; मात्र त्याऐवजी मुंबई आणि आसपासचा परिसर पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti