Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dombivli News: खोट्या कागदपत्रांचा डोंगर आणि 7 मजली इमारत;डोंबिवलीत बिल्डरच्या अटकेनंतर 100 कुटुंब संकटात

Dombivli News: खोट्या कागदपत्रांचा डोंगर आणि 7 मजली इमारत;डोंबिवलीत बिल्डरच्या अटकेनंतर 100 कुटुंब संकटात

Dombivli News: डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या विळख्याने आता एक भीषण वळण घेतले असून, शेकडो कुटुंबांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ज्या इमारतीत आपले हक्काचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचे आता समोर आले आहे.

खोट्या कागदपत्रांच्या जोरावर सात मजली इमारत उभी करणाऱ्या बिल्डरच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात 'शिव आराधना' नावाची सात मजली इमारत अनधिकृतपणे उभारल्याचा आरोप बिल्डर प्रफुल्ल गोरे याच्यावर आहे. केडीएमसीचे अधिकारी अरुण पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर विष्णू नगर पोलिसांनी तब्बल 8 महिन्यांनी ही कारवाई केली आहे. प्रफुल्ल गोरेला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे अनधिकृत इमारतींचे रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


( Titwala News: टिटवाळ्यात 600 कोटींचा 'चाळ झोल';हातोडा पडला, तरी इमारत उभी! वाचा धक्कादायक सत्य )

100 कुटुंबांच्या डोक्यावर टांगती तलवार

ज्या इमारतीसाठी ही कारवाई झाली आहे, त्या 'शिव आराधना' इमारतीमध्ये 100 हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही इमारत अनधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता पालिकेकडून त्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. आपल्या कष्टाची कमाई लावून घर घेणाऱ्या रहिवाशांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बेघर होण्याची भीती त्यांना सतावत आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बिल्डरने सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राजकीय वरदहस्त आणि फरार साथीदार

प्रफुल्ल गोरे हा केवळ समोर दिसणारा चेहरा असून, या संपूर्ण प्रकरणामागे काही बड्या राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे. या अनधिकृत बांधकामात गोरेला साथ देणारे त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. यामध्ये सूरज बुट्टे, काळ्या जोशी आणि एका आर्किटेक्टचा समावेश असून, पोलीस सध्या या तिघांचा शोध घेत आहेत. या तिघांच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


( Dombivli News: बाऊन्सरच्या गराड्यातला डोंबिवलीचा भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात! कसं उलगडलं फसवणुकीचं रॅकेट? )

65 अनधिकृत इमारतींचे कनेक्शन

डोंबिवलीतील बहुचर्चित 65 अनधिकृत इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश आहे. त्यामुळे प्रफुल्ल गोरेची अटक ही केवळ एका व्यक्तीची अटक नसून, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची ती पहिली पायरी मानली जात आहे. खोटे रेरा प्रमाणपत्र आणि बनावट कागदपत्रे वापरून डोंबिवलीत इमारतींचे जाळे कसे विणले गेले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi