Dailyhunt
Kalyan-Dombivli : आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण खाऊ घातलं; कल्याण-डोंबिवलीत नागरिक भडकले, संतापाचं कारण काय?

Kalyan-Dombivli : आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण खाऊ घातलं; कल्याण-डोंबिवलीत नागरिक भडकले, संतापाचं कारण काय?

Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील द्वारलीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरचरणची सुमारे तीन एकर आरक्षित जागा असताना त्या जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण करून चाळ उभी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या ठिकाणी जवळपास ९० घरे बांधली गेल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊनही महापालिकेला याची माहिती नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहे.

आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोचं पूजन करुन शेण खाऊ घातलं...

या प्रकरणात अधिकाऱ्यांचं साटेलोटे आहे. त्यामुळे जागा बळकावली गेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सौरव सिंह, सौरभ पांडे आणि विनोद तिवारी यांनी या संदर्भात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी केल्याचे सांगितले. ४ जानेवारीपासून ते या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काही दिवसांपूर्वी या सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. आंदोलनानंतरही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी प्रतीकात्मक आंदोलन करत आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोचं पूजन करुन शेण खाऊ घातले. सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रभाग कार्यालयासमाेर आंदोलन केलं. दरम्यान, केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना नोटीस देण्यात आली असून पुढील कारवाई केली जाईल.

- Mumbai News : मुंबईत देशातील सर्वात लांब बोगदा; दीड तासांचा प्रवास 15 मिनिटात, 11 KM मार्ग कसा असेल?

मात्र, प्रश्न असा उपस्थित होत आहे की, जागा शासनाची असताना तक्रारीची वाट का पाहावी लागली? महापालिकेचे अधिकारी आतापर्यंत काय करत होते? या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi