Dailyhunt
MI vs DC :हार्दिक पांड्याला काय झालं? दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा नवा सेनापती, टीममध्येही मोठे बदल

MI vs DC :हार्दिक पांड्याला काय झालं? दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा नवा सेनापती, टीममध्येही मोठे बदल

IPL 2026, Mumbai Indians vs Delhi Capitals : आयपीएल 2026 च्या रणांगणात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज (शनिवार, 4 एप्रिल 2026) हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसलाय.

मुंबई इंडियन्सचा नियमित कॅप्टन हार्दिक पांड्या आजच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे टीमची धुरा आता धडाकेबाज बॅटर सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने नुकताच T20 वर्ल्ड कप उंचावला होता, त्यामुळे आता तो मुंबईला या सिझनमध्ये सलग दुसरा विजय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॅप्टन बदलण्याचे कारण काय?

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या टॉस दरम्यान सूर्यकुमार यादव जेव्हा मैदानात आला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. सूर्याने हार्दिक न खेळण्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, हार्दिकची तब्येत ठीक नाही, त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळू शकणार नाही. हार्दिकच्या जागी सूर्या आज कॅप्टन म्हणून मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे, या सिझनच्या पहिल्या सामन्यात सूर्या इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला होता, ज्यावर क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा झाली होती. मात्र, आता दुसऱ्याच सामन्यात तो थेट कॅप्टन्सीच्या भूमिकेत दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये तीन मोठे बदल

दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन अक्षर पटेल याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने आपल्या प्लेइंग 11 मध्ये 3 महत्त्वाचे बदल केले आहेत. हार्दिक पांड्याच्या जागी दीपक चहारला संधी देण्यात आली आहे, तर ट्रेंट बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉशला टीममध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय गझनफरच्या जागी मिचेल सँटनरचा समावेश करण्यात आला आहे. 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईने सिझनची सुरुवात विजयाने केली आहे, त्यामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आहे.

( Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )

विजयाची लय टिकवण्याचे मुंबईसमोर आव्हान

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने देखील या सिझनची सुरुवात दणक्यात केली आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. विशेष म्हणजे, दिल्लीने आपल्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि ते त्याच विजयी संयोजनासह मैदानात उतरले आहेत. दिल्लीच्या होम ग्राउंडवर हा सामना होत असल्याने त्यांना स्थानिक परिस्थितीचा फायदा मिळू शकतो. मात्र, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गजांची साथ असलेल्या मुंबईला रोखणे दिल्लीसाठी सोपे नसेल.

( LSG vs DC : ही कसली जादू ! दिल्लीच्या नव्या हिरोनं टाकला IPL 2026 मधील सर्वात घातक बॉल! VIDEO पाहातच राहाल )

दोन्ही टीमची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स प्लेइंग 11: 1 रोहित शर्मा, 2 रायन रिकलटन (wk), 3 तिलक वर्मा, 4 सूर्यकुमार यादव (कॅप्टन), 5 नमन धीर, 6 शेरफेन रदरफोर्ड, 7 मिचेल सँटनर, 8 कॉर्बिन बॉश, 9 शार्दुल ठाकूर, 10 दीपक चहार, 11 जसप्रीत बुमराह.

इम्पॅक्ट प्लेयर ऑप्शन्स: मयंक मार्कंडे, रॉबिन मिन्झ, राज बावा, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग 11: 1 केएल राहुल (wk), 2 पाथुम निसांका, 3 नितीश राणा, 4 विपराज निगम, 5 अक्षर पटेल (कॅप्टन), 6 डेव्हिड मिलर, 7 ट्रिस्टन स्टब्स, 8 कुलदीप यादव, 9 लुंगी एन्गिडी, 10 टी नटराजन, 11 मुकेश कुमार.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi