Dailyhunt
Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व

Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व

Mumbai New Cricket Stadium : क्रिकेटवेड्या मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. मुंबईच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात म्हणजेच एमएमआर क्षेत्रात तब्बल 1 लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने साकारला जाणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाला जागतिक उंचीवर नेणारा ठरणार आहे.

नवे स्टेडियम नक्की कुठे असणार?

हे जागतिक दर्जाचे स्टेडियम नवी मुंबई परिसरात उभारले जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यात नुकतीच या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली.

नवी मुंबई हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून, तिथली उत्तम कनेक्टिव्हिटी आणि विमानतळाची जवळीक पाहता, एवढ्या मोठ्या क्षमतेच्या स्टेडियमसाठी ही जागा अत्यंत योग्य असल्याचे मानले जात आहे.

( LSG vs DC : ही कसली जादू ! दिल्लीच्या नव्या हिरोनं टाकला IPL 2026 मधील सर्वात घातक बॉल! VIDEO पाहातच राहाल )

कसे असेल हे भव्य स्टेडियम ?

हे स्टेडियम केवळ मोठेच नसेल, तर ते आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनी सज्ज असेल. सुमारे 1 लाख प्रेक्षक एकाच वेळी बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतील, अशी याची रचना असेल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर हे भारतातील दुसरे सर्वात मोठे स्टेडियम ठरेल. या स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी हाय-टेक ड्रेसिंग रूम्स, सराव मैदाने, उत्कृष्ट ड्रेनेज सिस्टीम आणि प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आसन व्यवस्था व पार्किंगची सोय असेल.

( Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्सशी रक्ताचं नातं, तरीही अर्जुननं का सोडली साथ? पहिल्यांदाच सांगितलं कारण )

कधीपासून कामाला सुरुवात?

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन अतिशय बारकाईने केले जात आहे. अजिंक्य नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 6 महिने या स्टेडियमचे डिझाइन, प्लॅनिंग आणि तांत्रिक प्रक्रियेसाठी दिले जाणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. याचाच अर्थ साधारण सहा महिन्यांनंतर या भव्य मैदानाची पायाभरणी होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या क्रिकेटला मिळणार नवी भरारी

मुंबईत आधीच वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील सारखी ऐतिहासिक मैदाने आहेत. मात्र, 1 लाख क्षमतेचे नवे स्टेडियम आल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने आणि मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याची मुंबईची क्षमता कित्येक पटीने वाढणार आहे. यामुळे केवळ क्रिकेटलाच नव्हे, तर क्रीडा पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि तळागाळातील क्रिकेट मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi