Dailyhunt
Nashik News: AI च्या मदतीने बनला 'पोलीस'; वर्दीचा रुबाब दाखवून महिलांना लुटायचा, कसा अडकला जाळ्यात?

Nashik News: AI च्या मदतीने बनला 'पोलीस'; वर्दीचा रुबाब दाखवून महिलांना लुटायचा, कसा अडकला जाळ्यात?

Nashik Crime News: तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी कसा केला जातो, याचा एक थरारक प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने स्वतःला पोलीस अधिकारी भासवून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या आसिफ तडवी या तोतया पोलिसाच्या वावी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

AI फोटोच्या मदतीने बनला पोलीस

आरोपी आसिफ तडवी हा अत्यंत शिताफीने महिलांची फसवणूक करत असे. तडवीने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचे पोलीस वर्दीतील आणि पोलीस ठाण्यात असल्याचे हुबेहूब बनावट फोटो तयार केले होते. इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट करून तो महिलांवर प्रभाव पाडत असे. सिन्नरमधील एका महिलेला त्याने अशाच प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. कधी घरगुती कारणांसाठी तर कधी पोलीस ट्रेनिंगच्या नावाखाली त्याने या महिलेकडून तब्बल 3 लाख रुपये उकळले.

(- US-Iran War : इराणची नवी खेळी! होर्मुजमधून जहाज वाहतूक सुरू होणार, मात्र भारतासह अनेक देशांना फटका बसणार)

ब्लॅकमेलिंग आणि अटक

जेव्हा पीडित महिलेने अधिक पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपीने आपले खरे स्वरूप दाखवले. आरोपीने एआयच्या मदतीने पीडित महिलेचे आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी महिलेला भेटण्याच्या बहाण्याने आरोपीला बोलावण्यास सांगितले आणि सापळा रचून आसिफ तडवीला अटक केली. तडवीच्या दोन मोबाईलमध्ये एआयने तयार केलेले वर्दीतील शेकडो फोटो, अनेक महिलांसोबतचे चॅटिंग स्क्रीनशॉट्स आणि अश्लील व्हिडिओ आढळले आहेत.

(- Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?)

अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा संशय

वावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडवीच्या मोबाईलमधील डेटा पाहता त्याने केवळ एका महिलेलाच नाही, तर अनेक महिलांना अशा प्रकारे जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. "एआयचा वापर करून कोणीही पोलीस वर्दीतील फोटो दाखवत असेल, तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करा," असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi