Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर

Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत एकूण 4 पोलीस अधिकारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हडपसर पोलीस ठाण्यातील 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर त्यांनी तीन बड्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

  • संजय मोगले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर)
  • हसिना शिकलगार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस चौकी, पुणे शहर)
  • हसन मुलाणी (पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर)

या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आणि हद्दीत अवैध व विषारी दारूची विक्री सुरू असताना त्यावर योग्य ती कारवाई न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

(- VIDEO: "मी रील स्टार आहे, माझी गाडी का अडवली?", टोलमाफीसाठी क्रिएटरची चिंधीगिरी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत)

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी पोलीस चौकीतील 6 जण निलंबित

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही अशाच प्रकारची कडक भूमिका घेत दापोडी पोलीस चौकीशी संबंधित 2 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. यामध्ये खालील नावांचा समावेश आहे.

  • विजय वाघमारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दापोडी पोलीस ठाणे)
  • राजू भास्कर (फौजदार तथा तपास पथक प्रमुख)
  • जयदीप सोनवणे (पोलीस कर्मचारी)
  • नवनाथ पोटे (पोलीस कर्मचारी)
  • सागर जाधव (पोलीस कर्मचारी)
  • विशाल काळे (पोलीस कर्मचारी)

पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना पोलिसांचा निष्काळजीपणा आणि वरिष्ठ पातळीवरील पर्यवेक्षणाच्या अभावामुळे घडल्याचे समोर आले आहे. विषारी दारूच्या या गंभीर प्रकरणाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा कमालीची मलिन झाली. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

पोलीस दलाची जनमानसातील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कडक संदेश देण्यासाठी दोन्ही पोलीस आयुक्तांनी ही निलंबनाची कायदेशीर कारवाई केल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi