अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News Today : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली येथे एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. वीज वितरण व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुरेश थोरात (44) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. धोकादायक अवस्थेत वाकलेल्या वीज खांबामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांडोली येथील शेतकरी सुरेश थोरात शेतामध्ये काम करत असताना वाकलेल्या वीज खांबामुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असली तरी वीज वितरण यंत्रणेतील हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार,अनेक ठिकाणी शेतामध्ये किंवा बांधाजवळ उभे असलेले वीज खांब मोठ्या प्रमाणावर वाकलेल्या अवस्थेत आहेत.या खांबांची वेळोवेळी दुरुस्ती किंवा तपासणी न झाल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे ही समस्या केवळ चांडोलीपुरती मर्यादित नसून संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे.
>> Pune News: शेजाऱ्याने चिमुकलीला रुममध्ये बोलावलं..नराधमाचं कृत्य पाहून पीडितेची आई अन् आत्या हादरली
2019 ते 2024 या कालावधीत 6700 जणांचा मृत्यू
सातगाव पठार परिसरातील गावांमध्ये देखील शेतांमध्ये उभे असलेले अनेक वीज खांब धोकादायक स्थितीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.त्यामुळे हे खांब जणू एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत उभे असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. यापूर्वीही शेतामध्ये पडलेल्या तारा किंवा दोषपूर्ण वीज यंत्रणेमुळे अनेक शेतकऱ्यांना वीजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याच्या घटना राज्यभर घडल्या आहेत. आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत वीजेच्या धक्क्यामुळे मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. राज्यात 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 6700 हून अधिक लोकांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून हजारो जण जखमी किंवा अपंग झाले आहेत.
>> Kalyan News: विद्यार्थ्यांनो अलर्ट राहा, कल्याणमध्ये JEE परीक्षा केंद्रावर एका तरुणीला प्रवेश नाकारला, कारण..
रिपोर्ट्सनुसार, राज्यातील वीज वितरण व्यवस्था पाहणाऱ्या महावितरणचे राज्यभर मोठे जाळे असून सुमारे 3.16 कोटी ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.तसेच हजारो किलोमीटर लांबीच्या उच्चदाब आणि निम्नदाब वीजवाहिन्यांचे जाळे राज्यभर पसरलेले आहे.मात्र ग्रामीण भागात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात आहे.

