Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Summer Tips: उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ऋजुता दिवेकर यांचा मोलाचा सल्ला; या 3 गोष्टींनी मिळेल नैसर्गिक थंडावा

Summer Tips: उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ऋजुता दिवेकर यांचा मोलाचा सल्ला; या 3 गोष्टींनी मिळेल नैसर्गिक थंडावा

Rujuta Diwekar Shares Ancestral Wisdom for Summer Health: उन्हाळ्याचा कडाका सध्या इतका वाढलाय की घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. एसी आणि कुलर लावूनही अंगाची लाहीलाही थांबत नाहीये.

अशा वेळी महागड्या गॅजेट्सवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी सांगितलेले काही 'देशी जुगाड' खरोखरच वरदान ठरू शकतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी उन्हाळ्याच्या या भीषण लाटेत शरीराला नैसर्गिकरित्या आतून थंड ठेवण्यासाठी 3 अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला ना विजेची गरज आहे, ना महागड्या तंत्रज्ञानाची!

वाळा किंवा वाळ्याची मुळे

उन्हाळ्यात साधे पाणी पिणे अनेकदा नकोसे वाटते, अशा वेळी पाण्याचा माठ किंवा बाटलीत 2-3 वाळ्याची मुळे टाकणे हा एक उत्तम पर्याय आहे. ऋजुता दिवेकर याला भारताचे हक्काचे इन्फ्युज्ड वॉटर मानतात. यामुळे पाण्याला केवळ नैसर्गिक गोडवाच येत नाही, तर शरीराला आवश्यक असलेला थंडावा मिळतो.

वाळ्याचे फायदे केवळ तहान भागवण्यापुरते मर्यादित नाहीत. उन्हाळ्यामुळे होणारी डोकेदुखी, चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा केसातील कोंडा यांसारख्या समस्यांवरही वाळा गुणकारी ठरतो. जुन्या काळात वाळ्यापासून बनवलेले हातपंखे आणि पडदे वापरले जात असत, ज्याचा आधार आजही अनेक ठिकाणी कुलरमध्ये थंडाव्यासाठी घेतला जातो.

( Dalda Story : भारतीय किचनवर 90% ताबा असणारा डालडा अचानक गायब का झाला? 'ब्रँड' ते 'बॅड' प्रवासाचं कारण काय? )

मेहंदीचा विसरलेला वापर

लहानपणी हौसेने लावली जाणारी मेहंदी उन्हाळ्यातील उष्णता शोषून घेण्याचे एक उत्तम साधन आहे. हातावर मेहंदी लावल्याने शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते. ऋजुता दिवेकर यांच्या मते, मेहंदीचा सुगंध मन शांत करतो आणि ताणतणाव कमी करण्यासाठी औषधासारखा काम करतो. जर तुम्हाला उन्हामुळे अस्वस्थ किंवा चिडचिड होत असेल, तर मेहंदी लावल्याने तुम्हाला नक्कीच शांत वाटू शकते.

ताक: उन्हाळ्याचे अमृत

उन्हाळ्यात दररोजच्या जेवणात किमान 2 ते 3 वेळा ताकाचा समावेश करणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ताकातून शरीराला प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 मिळते. ताक हे केवळ पचनासाठी चांगले नसून ते एक उत्तम प्रोबायोटिक, प्रीबायोटिक आणि पोस्टबायोटिक म्हणूनही काम करते.

( Cooling Tips : AC चं बिल झिरो होणार! गच्चीवरच्या या साध्या युक्तीने अख्खं घर राहील फ्रिजसारखं कूल )

उन्हामुळे शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे थकवा जाणवतो. अशा वेळी ताकामध्ये थोडे मीठ, हिंग आणि जिरे पूड घालून प्यायल्याने पचन सुधारते, भूक वाढते आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो. एवढेच नाही तर नियमित ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवर एक वेगळीच चमक दिसून येते. या साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत प्रभावी उपायांनी तुम्ही या उन्हाळ्यातही स्वतःला फ्रेश ठेवू शकता.

इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi