Dailyhunt
Traffic Jam: विकेंड, सलग सुट्ट्यांचा फटका! 2 महामार्गांवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी; प्रवासाआधी वाचा अपडेट

Traffic Jam: विकेंड, सलग सुट्ट्यांचा फटका! 2 महामार्गांवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी; प्रवासाआधी वाचा अपडेट

मेहबूब जमादार, प्रतिनिधी:

Mumbai Goa Highway Traffic Jam: महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्यांमुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. महाराष्ट्र दिन आणि सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात निघाले आहेत.

या वाहन चालकांना मुंबई- गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील नागोठणे जवळ कोकणात येणाऱ्या मार्गिकेवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! तब्बल 30 तास 'या' 6 वॉर्डांमध्ये पुरवठा बंद, वाचा संपूर्ण यादी

मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

महाराष्ट्र दिन आणि त्यानंतर जोडून आलेल्या सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, या उत्साहावर मुंबई-गोवा महामार्गावरील भीषण वाहतूक कोंडीने विरजण घातले आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, पर्यटकांना तासनतास एकाच ठिकाणी उभे राहावे लागत आहे.

नागोठणे येथील कामत हॉटेलपासून ते वाकण फाटा इथपर्यंत वाहनांचा ओघ थांबला आहे. सलग सुट्ट्यांचे निमित्त साधून मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने लोक खाजगी वाहनाने कोकणात निघाले आहेत. मात्र, महामार्गाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम या कोंडीला मुख्यत्वे कारणीभूत ठरत आहे. रस्त्याची दुरवस्था आणि अरुंद मार्गिकांमुळे वाहनांचा वेग प्रचंड मंदावला आहे.

बेशिस्त वाहनचालकांमुळे खोळंबा

काही बेशिस्त वाहनचालकांमुळे या समस्येत अधिकच भर पडली आहे. रांग मोडून पुढे जाण्याच्या घाईत अनेक ठिकाणी 'डेडलॉक' निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी, वाहनांची संख्या इतकी अफाट आहे की यंत्रणा हतबल होताना दिसत आहे. उन्हाचा कडाका आणि त्यात झालेली ही कोंडी यामुळे लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत.

पुणे- सातारा महामार्गावरही ट्रॅफिक जाम

दुसरीकडे, मुंबई - पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुण्याहून सातारा कराड,सांगली कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच खेड शिवापुर टोलनाक्यापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. यामुळे गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप,सहन करावा लागत आहे. टोल नाक्यावरून पुढे जाण्यास वाहनांना विलंब होत असल्यामुळे पाठीमागे मोठया प्रमाणात वाहनांचा रांगा लागल्या आहेत.

Maharashtra Day 2026: 106 हुतात्मे अन् अथांग संघर्ष! मुंबईसाठी मराठी माणसाने दिल्लीला कसं झुकवलं? वाचा सविस्तर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NDTV Marathi