Vasai News: वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मृतदेह सापडण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन आठवड्यांतील ही सहावी घटना असल्याने नागरिकांमध्ये आता असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
रविवारी सायंकाळी काही स्थानिकांना महामार्गावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ दुर्गंधी आली. तपास केला असता तिथे एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे असून त्याला पांढरी दाढी आहे. मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे, अपघाती आहे की घातपात, याचा शोध पोलीस घेत आहेत.
(- Nagpur News: "नोकरीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्...", नागपूरमधील धक्कादायक प्रकार)
15 दिवसांतील सापडलेले मृतदेह
21 मार्च (शिरवली): महिलेचा कुजलेला मृतदेह; पतीनेच खून केल्याचे निष्पन्न, आरोपी पती अटकेत.
23-24 मार्च (धानिवबाग): 6 वर्षीय बेपत्ता बालिकेचा विहिरीत मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात.
26-27 मार्च (पेल्हार फाटा): शिर छाटलेल्या अवस्थेत पुरुषाची हत्या; आर्थिक वादातून खून झाल्याचे स्पष्ट, आरोपी जेरबंद.
मार्च अखेर (नालासोपारा पश्चिम): डी-मार्ट परिसरातील नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह.
30-31 मार्च (फुलपाडा): एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला.
5 एप्रिल (विरार फाटा): सडलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह.
नागरिकांची वाढती चिंता
एकामागून एक मृतदेह सापडत असल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आणि निर्जन स्थळांमुळे अशा घटनांना वाव मिळत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान
सापडलेल्या सहा मृतदेहांपैकी काही प्रकरणांत पोलिसांनी तातडीने आरोपींना जेरबंद केले असले, तरी काही मृतदेहांची ओळख पटवणे अद्यापही पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचा आधार घेऊन पोलीस या अज्ञात मृतदेहांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

