Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१,३१७ दिवसांचा दुष्काळ कायम! बाबर आझमचे शतक पुन्हा हुकले

१,३१७ दिवसांचा दुष्काळ कायम! बाबर आझमचे शतक पुन्हा हुकले

NEWS डंका 2 weeks ago

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याच्या कसोटी क्रिकेटमधील शतकाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. तब्बल १,३१७ दिवसांनंतरही त्याच्या बॅटमधून कसोटी शतक झळकू शकले नाही. त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बाबर ८८ धावांवर धावबाद झाला आणि त्याचे शतक केवळ १२ धावांनी हुकले.

सामन्यात बाबर उत्कृष्ट लयीत फलंदाजी करत होता. त्याच्या बॅटमधून आकर्षक फटके पाहायला मिळत होते आणि यावेळी त्याच्या शतकाचा दुष्काळ संपेल, अशी चाहत्यांना आशा वाटत होती. मात्र, ८८ धावांवर असताना त्याने हलक्या हाताने चेंडू खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा साथीदार अब्दुल्ला शफीक सुरुवातीला पुढे सरकला, पण नंतर मागे फिरला. तोपर्यंत बाबर क्रीजच्या बऱ्याच बाहेर आला होता.

बाबरने जीव तोडून परतण्याचा प्रयत्न केला. क्रीज गाठण्यासाठी त्याने डाइव्हही मारली, मात्र तो काही इंचांनी कमी पडला आणि धावबाद झाला. शतक हुकल्याची निराशा पॅव्हेलियनकडे परतताना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

बाबर आझमने कसोटी क्रिकेटमधील अखेरचे शतक २६ डिसेंबर २०२२ रोजी न्यूझीलंडविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याला तीन अंकी मजल गाठता आलेली नाही.

दरम्यान, सामन्यात पाकिस्तानने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात पाकिस्तानने ३८७ धावा करत वेस्ट इंडिजवर ४३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजची ६ बाद १०३ अशी अवस्था केली. कॅरेबियन संघाची आघाडी केवळ ६० धावांची असून त्यांचे फक्त ४ गडी शिल्लक आहेत.

पाकिस्तानकडून साजिद खान याने १२ षटकांत ३२ धावा देत ४ बळी घेतले, तर अली उस्मान याने २ बळी मिळवत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka