Dailyhunt
१९८४ शीखविरोधी दंग्यांच्या पीडितांचे वकील एच. एस. फुलका भाजपमध्ये

१९८४ शीखविरोधी दंग्यांच्या पीडितांचे वकील एच. एस. फुलका भाजपमध्ये

NEWS डंका 0 months ago

'आप'चे माजी आमदार फुलका सात वर्षांनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात

१९८४ मधील शीखविरोधी दंग्यांच्या पीडितांसाठी कायदेशीर लढा देणारे वरिष्ठ वकील एच. एस. फुलका यांनी बुधवारी (१ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला.

आम आदमी पक्षाचे माजी आमदार असलेले फुलका सुमारे सात वर्षांनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात परतले आहेत. त्यांच्या या निर्णयाकडे पंजाबमध्ये भाजपसाठी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. फुलका यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात हरदीप सिंग पुरी, मनजिंदर सिंग सिरसा आणि तरुण चुघ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

एच. एस. फुलका हे सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील असून, १९८४ शीखविरोधी दंग्यांच्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. फुलका यांनी २०१४ मध्ये आम आदमी पक्षासोबत राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांनी लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी दाखा मतदारसंघातून विजय मिळवला आणि काही काळ विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले.

मात्र, २०१८ मध्ये फुलका यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्या वेळी दंगाग्रस्तांच्या प्रकरणांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर २०१९ च्या सुरुवातीला त्यांनी आप पक्ष देखील सोडला. याशिवाय, डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी थोड्या काळासाठी शिरोमणी अकाली दलाशीही संबंध ठेवले होते.

जवानांच्या वेतन वितरणात गोंधळ, लष्करी रुग्णालयांची स्थिती चिंताजनक

सकाळी ६ वाजता नोकरी गेल्याचा मेल; ओरेकलमध्ये ३०,००० कर्मचारी कपात

आता कागद पेन नाही, डिजिटल जनगणना, आजपासून सुरुवात

ऑपरेशन अरहामा: जम्मू काश्मीरच्या गांदरबलमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

पंजाबमध्ये २०२७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी फुलका यांचा भाजपमध्ये प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे पक्षाला शीख समुदायात तसेच मानवाधिकार विषयांवर आपली पकड अधिक मजबूत करण्यास मदत होऊ शकते. एच. एस. फुलका यांची प्रतिमा प्रामाणिक आणि न्यायासाठी लढणाऱ्या नेत्याची आहे, जी भाजपसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. सध्या त्यांच्या भूमिकेबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र आगामी काळात पंजाबच्या राजकारणात त्यांना सक्रिय भूमिका दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka