महिला आशिया कप २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असताना ट्रॉफी वितरणावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी १३ सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानच्या 'जिओ सुपर' या क्रीडा वाहिनीच्या वृत्तानुसार, नकवी हे स्पर्धेच्या समारोप सोहळ्याचे मुख्य पाहुणे असतील आणि विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करतील. नकवी हे एसीसीचे अध्यक्ष असण्यासोबतच पाकिस्तानचे फेडरल गृहमंत्री आणि नार्कोटिक्स कंट्रोल मंत्रीही आहेत.
गेल्या वर्षी पुरुषांच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यातही भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ट्रॉफी वितरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
मात्र, भारतीय संघाने नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याचे वृत्त होते. भारतीय संघाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जारूनी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, हा प्रस्ताव मान्य झाला नसल्याचे सांगितले जाते.
नकवी मंचावर आल्यानंतर भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर ट्रॉफी मंचावरून हटवण्यात आली आणि भारतीय संघाला त्या वेळी ट्रॉफी मिळाली नव्हती, अशी चर्चा झाली होती.
महिला आशिया कपमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
यातील पाकिस्तानविरुद्धचा सामना विशेष ठरला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांत गुंडाळला आणि भारताने केवळ ८.४ षटकांत ७ विकेट्स राखून विजय मिळवला.
त्यामुळे भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, भारताने अंतिम सामन्यात बाजी मारली आणि मोहसिन नकवी यांच्या उपस्थितीत ट्रॉफी वितरण झाले, तर गेल्या वर्षीच्या पुरुषांच्या आशिया कपप्रमाणेच यंदाही ट्रॉफी स्वीकारण्यावरून नवा वाद निर्माण होतो का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

