Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिमानाचा सुवर्णक्षण; कॉमनवेल्थ २०३०चे यजमानपद भारताकडे!

अभिमानाचा सुवर्णक्षण; कॉमनवेल्थ २०३०चे यजमानपद भारताकडे!

NEWS डंका 3 weeks ago

करा दिवस रंगलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा (सीडब्ल्यूजी) २०२६ चा रविवारी ग्लासगो येथील ओव्हीओ हायड्रो स्टेडियममध्ये अत्यंत भव्य आणि दिमाखदार समारोप झाला. या सोहळ्यात २०३० च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांचे यजमानपद अधिकृतपणे भारताकडे सोपविण्यात आले.

त्यामुळे आता शताब्दी वर्षातील ऐतिहासिक स्पर्धांचे आयोजन अहमदाबाद येथे होणार असून, भारताच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय सुरू झाला आहे.

समारोप सोहळ्यात भारतीय संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेचा अप्रतिम संगम जगासमोर सादर करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, ऋषभ शर्मा आणि भूमी त्रिवेदी यांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण स्टेडियम भारावून गेले. 'वंदे मातरम्', 'शिव स्तोत्र' आणि 'सुनो गौर से दुनिया वालों' या गीतांनी भारतीय प्रेक्षकांसह परदेशी उपस्थितांनाही मंत्रमुग्ध केले. हजारो भारतीयांनी उभे राहून जल्लोष केला, तर विदेशी प्रेक्षकांनीही भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.

कॉमनवेल्थ गेम्सचा अधिकृत ध्वज स्कॉटलंडकडून भारताकडे सोपविण्याचा क्षण हा संपूर्ण सोहळ्याचा सर्वात भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे प्रतीकात्मक स्वरूपात ध्वज सुपूर्द करण्यात आला. त्याचवेळी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनीही कॉमनवेल्थचा ध्वज स्वीकारत भारताच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारली.

समारोप सोहळ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेच्या रंगतदार सादरीकरणाने झाली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रॉक बँड सिंपल माइंड्स, प्रसिद्ध नृत्यगट डायव्हर्सिटी तसेच अनेक स्कॉटिश कलाकारांनी संगीत, नृत्य आणि दृश्य सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर सर्वांचे लक्ष भारताच्या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे लागले.

अठरा मिनिटे सत्तावीस सेकंद चाललेल्या भारताच्या विशेष सादरीकरणात देशाची सांस्कृतिक समृद्धी, क्रीडाप्रेम आणि भविष्यदृष्टी प्रभावीपणे मांडण्यात आली. 'भारत… जिथे खेळ ही जीवनशैली आहे' या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेवर आधारित आणि 'वंदे मातरम्'च्या दीडशेव्या वर्षानिमित्त सादर झालेल्या कार्यक्रमातून भारताचा शांतता, एकता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश जगभर पोहोचविण्यात आला.

यानंतर विशेष चित्रफितीद्वारे कॉमनवेल्थ स्पर्धांमधील भारताचा गौरवशाली प्रवास, पदकांची परंपरा आणि जागतिक क्रीडा क्षेत्रातील वाढते स्थान अधोरेखित करण्यात आले. त्यानंतर भारतीय संगीतकार ऋषभ शर्मा आणि स्कॉटिश कलाकार रॉस एन्सली यांच्या अनोख्या जुगलबंदीने ग्लासगोपासून अहमदाबादपर्यंतचा सांस्कृतिक सेतू उभारला.

शंकर महादेवन, ऋषभ शर्मा आणि भूमी त्रिवेदी यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण स्टेडियम भारतीय संगीताच्या तालावर थिरकू लागले. दमदार नृत्यरचना, नेत्रदीपक दृश्य परिणाम आणि भारतीय परंपरेचा आधुनिक आविष्कार यामुळे अहमदाबाद २०३० कशी भव्य आणि जागतिक दर्जाची स्पर्धा ठरणार आहे, याची प्रभावी झलक जगाला पाहायला मिळाली.

पारंपरिक खेळाडू संचलनादरम्यान भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण आला. कॉमनवेल्थ बॉक्सिंग विजेती जॅस्मिन लॅम्बोरिया हिने तिरंगा हातात घेत भारतीय पथकाचे नेतृत्व केले. कॉमनवेल्थमधील ७४ देश आणि प्रदेशांतील खेळाडूंनी एकत्रित संचलन करत मैत्री, ऐक्य आणि क्रीडाभावनेचा संदेश दिला.

समारोपाच्या अखेरीस कॉमनवेल्थ गेम्सचा ध्वज अधिकृतपणे अहमदाबादकडे सुपूर्द करण्यात आला. २०३० मधील स्पर्धा या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणार असून, ऑस्ट्रेलियानंतर दोन वेळा कॉमनवेल्थ स्पर्धांचे आयोजन करणारा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष अहमदाबाद २०३० कडे लागले असून, भारताच्या क्रीडा इतिहासातील आणखी एका सुवर्ण पर्वाची अधिकृत उलटगणती सुरू झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka