एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय कुस्तीपटू सुजीत कलकलने पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत भारताच्या कुस्तीतील सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला. नागोया सिटी इनाए स्पोर्ट्स सेंटरमध्ये झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात सुजीतने ताजिकिस्तानच्या अब्दुलमजीद कुदियेवचा १०-९ असा पराभव केला.
अंतिम सामन्यात सुजीतची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तो एका टप्प्यावर २-९ असा पिछाडीवर होता. मात्र, अवघ्या काही मिनिटांत त्याने सामन्याचे चित्र पालटले. अखेरच्या क्षणी सलग ८ गुणांची कमाई करत सुजीतने १०-९ अशी आघाडी घेतली आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
फायनलच्या आधी सुजीतने दमदार कामगिरी केली. उपांत्य फेरीत त्याची गाठ जपानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन कोटारो कियोका याच्याशी पडली. पहिल्या पीरियडमध्ये सुजीत ०-२ असा पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या पीरियडमध्ये त्याने तीन गुण मिळवत जोरदार पुनरागमन केले. सामना ३-३ असा बरोबरीत संपला; नियमांनुसार सुजीत विजेता ठरला आणि त्याने अंतिम फेरी गाठली.
त्याआधी सुजीतने अफगाणिस्तानच्या सैयद उमर जजईवर १३-३ असा तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवला. सुरुवातीला ०-३ असा पिछाडीवर गेल्यानंतर त्याने पुश-आउट, शोल्डर थ्रो, थ्रो आणि रोलच्या माध्यमातून गुणांची कमाई केली.
क्वार्टर फायनलमध्ये त्याने इराणच्या अब्बास इब्राहिमजादेहसावदकोही याच्यावर एकही गुण न गमावता तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवला.
ताजिकिस्तानचा कुदियेव अंतिम सामन्यात ९-२ अशी आघाडी घेत सुवर्णपदकाच्या जवळ पोहोचला होता. मात्र, सुजीतने हार मानली नाही. अखेरच्या क्षणी त्याने सलग ८ गुण मिळवत १०-९ असा विजय मिळवला.
या शानदार पुनरागमनामुळे सुजीत कलकलने एशियन गेम्स २०२६ मध्ये भारताला कुस्तीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

