बेरोजगारी ४.१% तरी नोकरी मिळणे झाले कठीण
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सध्या एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बेरोजगारीचा दर ४.१ टक्के असला, तरी नव्या नोकऱ्या मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातही करत नाहीत आणि नव्या कर्मचाऱ्यांची भरतीही करत नाहीत. अर्थतज्ज्ञांनी या परिस्थितीला 'No Hire, No Fire' म्हणजेच 'ना भरती, ना कर्मचारी कपात' असे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेचा जॉब मार्केट वरवर स्थिर दिसत असला, तरी प्रत्यक्षात तो मोठ्या प्रमाणावर ठप्प झाल्याचे चित्र आहे.
२०२६ मध्ये आतापर्यंत अमेरिकन कंपन्यांनी दर महिन्याला सरासरी केवळ ६१ हजार नव्या नोकऱ्या जोडल्या आहेत. याउलट २०२३-२४ मध्ये दर महिन्याला सरासरी १.६६ लाख नोकऱ्या निर्माण होत होत्या. जुलैमध्ये तर नॉनफार्म पेरोल रोजगारात तब्बल २३ हजारांची घट झाली. म्हणजेच कंपन्यांची भरती केवळ मंदावलेली नाही, तर काही काळात रोजगारसंख्येत घटही होत आहे.
या परिस्थितीमागे अनेक कारणे आहेत. अमेरिकेतील आर्थिक अनिश्चितता, ट्रम्प प्रशासनाची टॅरिफ धोरणे, वाढलेला खर्च, तेलाच्या किमती आणि जागतिक तणाव यामुळे कंपन्या नव्या गुंतवणुकीबाबत सावध झाल्या आहेत. त्यातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर कंपन्यांच्या मनुष्यबळाच्या गरजेवर परिणाम करत आहे. आधी जे काम करण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची गरज होती, त्यातील काही कामे आता एआयच्या मदतीने केली जात आहेत. जुलैमध्ये खासगी क्षेत्रात केवळ ४४ हजार नोकऱ्या वाढल्या.
मात्र कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी का काढत नाहीत, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी केल्यानंतर पुन्हा भरती करताना कंपन्यांना अडचणी आणि अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता कंपन्या कर्मचारी टिकवून ठेवत, मात्र नव्या भरतीवर नियंत्रण ठेवत आहेत. साप्ताहिक बेरोजगारी दावेही बहुतांश काळ २ लाखांच्या आसपास राहिले आहेत.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका फ्रेशर्स, नव्या नोकरीच्या शोधात असलेले आणि करिअर बदलू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बसत आहे. जुलैमध्ये २७ आठवड्यांहून अधिक काळ बेरोजगार असलेल्या लोकांची संख्या सुमारे १८ लाख होती. त्यामुळे कमी बेरोजगारीचा दर असला तरी नोकरीच्या संधींची कमतरता ही अमेरिकन अर्थव्यवस्थेसमोरील मोठी चिंता बनली आहे. पुढील काळात फेडरल रिझर्व्हची धोरणे, टॅरिफबाबतची स्पष्टता आणि एआयचा वाढता वापर अमेरिकेच्या रोजगार बाजाराची दिशा ठरवणार आहे.

