Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भांडूपमध्ये रस्ता खचला; टेम्पो, झाड गेले वाहून

भांडूपमध्ये रस्ता खचला; टेम्पो, झाड गेले वाहून

एलबीएस मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी (४ जुलै) भांडूपमध्ये धक्कादायक घटना घडली. एलबीएस मार्गावरील आशियन पेंट्स परिसरासमोर सुरू असलेल्या उत्खननाच्या ठिकाणी अचानक रस्ता खचला.

या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक टेम्पो आणि मोठे झाड थेट खोल खड्ड्यात कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

माहितीनुसार, दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्खनन केलेल्या जागेजवळील माती खचली आणि रस्त्याचा मोठा भाग अचानक कोसळला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही क्षणांतच रस्त्याच्या कडील भाग जमीनदोस्त झाला आणि त्यावर उभा असलेला टेम्पो तसेच झाड खड्ड्यात गडप झाले.

घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने तातडीने परिसराला बॅरिकेड्स लावून बंदिस्त केले, वाहतूक वळवली आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या. तसेच रस्ता पूर्ववत करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे एलबीएस मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. भांडूप, कांजूरमार्ग आणि विक्रोळीकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.

महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा?

पावसात न्हालेलो आपलो कोकण!

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून मालाड सबवे, अंधेरी, जोगेश्वरी, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर आणि इतर भागांमध्येही जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी झाडे कोसळणे, रस्ते जलमय होणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka