Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची तिकीट विक्रीत धूम;

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची तिकीट विक्रीत धूम;

NEWS डंका 3 weeks ago

भारताच्या आगामी दौऱ्यामुळे न्यूझीलंडमध्ये क्रिकेटच्या तिकिटांना विक्रमी मागणी निर्माण झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय उन्हाळी हंगामाची सुरुवातच विक्रमी झाली असून, 'क्रिकेट नेशन' सदस्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्री-सेलच्या पहिल्या ४८ तासांत तब्बल २६ हजार तिकिटांची विक्री झाली आहे.

भारतीय संघ ऑक्टोबर २०२६ ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात एकूण १२ सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये ५ टी-२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे.

ऑकलंडच्या ईडन पार्क येथे होणारे व्हाइट-बॉल सामने सुरुवातीच्या तिकीट विक्रीतील सर्वात मोठे आकर्षण ठरले आहेत. क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल येथेही तिकिटांना मोठी मागणी आहे. ९ हजार प्रेक्षक क्षमतेच्या या मैदानावर २२ आणि २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुरुवातीच्या दोन टी-२० सामन्यांसाठी तसेच २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी तिकिटे लवकरच संपण्याची शक्यता आहे.

वेलिंग्टनमध्येही तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथे तिसरा टी-२० आणि दुसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी १९ नोव्हेंबरपासून बेसिन रिझर्व्ह मैदानावर सुरू होईल.

न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य मार्केटिंग आणि कमर्शियल अधिकारी ग्लेन क्रिचली यांनी सांगितले की, भारताच्या दौऱ्याबाबत चाहत्यांमध्ये असलेला उत्साह तिकीट विक्रीतून स्पष्ट झाला आहे.

ते म्हणाले, 'पहिल्या दोन दिवसांत तिकिटांची विक्रमी विक्री झाली आहे. न्यूझीलंडच्या चाहत्यांसाठी भारताशी संबंधित क्रिकेटचा आनंद घेण्याची आणि जगातील काही सर्वोत्तम क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची ही दुर्मीळ संधी आहे.'

तिकिटांच्या किमती मागील हंगामाइतक्याच ठेवण्यात आल्याचेही क्रिचली यांनी सांगितले. 'क्रिकेट नेशन'च्या अॅक्सेस कोडचा वापर केल्यास ३० न्यूझीलंड डॉलरपेक्षा कमी किमतीत तिकीट मिळू शकते.

सामान्य प्रेक्षकांसाठी तिकीट विक्री ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, चाहते 'क्रिकेट नेशन'साठी नोंदणी करून प्री-सेलचा लाभ घेऊ शकतात. सदस्यांना तिकिटांवर १५ टक्के सवलत मिळणार आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka