Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताच्या पुरुष कबड्डी संघाची पुन्हा सुवर्णभरारी!

भारताच्या पुरुष कबड्डी संघाची पुन्हा सुवर्णभरारी!

NEWS डंका 3 weeks ago

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाने दिमाखदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात कर्णधार सुनील कुमार यांच्या नेतृत्वाखाली भारताने इराणचा ४०-३४ असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारत आणि इराणमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या ८ मिनिटांत सामना ५-५ असा बरोबरीत होता. त्यानंतर भारताने आक्रमक खेळ करत १०-८ अशी आघाडी घेतली. अर्जुन देशवालच्या दमदार रेडमुळे भारताची आघाडी १२-९ पर्यंत पोहोचली.

मात्र, इराणच्या मजबूत बचावफळीने जोरदार पुनरागमन केले. इराणने भारताला ऑलआउट करत १४-१३ अशी आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यंत इराणने ही आघाडी कायम ठेवत १८-१७ अशी स्थिती केली.

दुसऱ्या हाफमध्ये भारताने सामन्याचा वेग बदलला. इराणच्या भक्कम बचावाला भेदत भारतीय रेडर्सनी सातत्याने गुण मिळवले. भारताने दमदार पुनरागमन करत ३४-२७ अशी निर्णायक आघाडी मिळवली.

भारताच्या बचावफळीत सुमितने शानदार कामगिरी केली, तर अर्जुन देशवालने रेडमध्ये महत्त्वाचे गुण मिळवत संघाला विजयाच्या जवळ नेले. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात राहुलने केलेल्या शानदार टॅकलमुळे भारताची आघाडी ३६-२९ झाली.

शेवटच्या काही मिनिटांत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात इराणकडून चुका झाल्या आणि त्याचा भारताने पुरेपूर फायदा घेतला. अखेर भारताने ४०-३४ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर कब्जा केला.

विशेष म्हणजे, मागील एशियन गेम्समध्येही भारताने अंतिम सामन्यात इराणचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे भारतीय पुरुष कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

यापूर्वी भारतीय महिला कबड्डी संघानेही सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघाने इराणचा ३७-३४ असा पराभव केला. त्यामुळे एशियन गेम्स २०२६ मध्ये कबड्डीमध्ये भारताने महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांत सुवर्णपदक जिंकले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka