Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताच्या सुखोई विमानांना अत्याधुनिक संरक्षण कवच

भारताच्या सुखोई विमानांना अत्याधुनिक संरक्षण कवच

NEWS डंका 0 months ago

अँटी-जॅमिंग नेव्हिगेशन प्रणालीमुळे युद्धक्षमता होणार अधिक मजबूत

भारतीय हवाई दलाच्या ताकदीत आणखी मोठी भर पडणार असून देशातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांना आता अत्याधुनिक अँटी-जॅमिंग आणि अँटी-स्पूफिंग नेव्हिगेशन प्रणालीने सज्ज केले जाणार आहे.

आधुनिक युद्धामध्ये इलेक्ट्रॉनिक हल्ल्यांचे वाढते धोके लक्षात घेता संरक्षण मंत्रालयाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यामुळे भारतीय हवाई दलाची युद्धक्षमता अधिक मजबूत होणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प 'मेक इन इंडिया' अंतर्गत राबवला जाणार असल्याने स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानालाही मोठे बळ मिळणार आहे.

सध्या जगभरातील युद्धांमध्ये शत्रूकडून रडार आणि नेव्हिगेशन सिस्टीममध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी जॅमिंग आणि स्पूफिंगसारख्या तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या तंत्रामुळे लढाऊ विमानांचे दिशानिर्देश, लक्ष्य आणि स्थानामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. मात्र भारतीय हवाई दलासाठी विकसित होणारी नवी प्रणाली अशा इलेक्ट्रॉनिक हल्ल्यांनाही प्रभावीपणे निष्प्रभ करणार आहे. त्यामुळे वैमानिकांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अचूक नेव्हिगेशन सुविधा उपलब्ध राहणार असून युद्ध मोहिमा अधिक सुरक्षित आणि अचूक पद्धतीने पार पाडता येणार आहेत.

चलो बुलावा आया है, बांगलादेशने बुलाया है…अनेक बांगलादेशी जमले सीमेवर!

केरळचे मुख्यमंत्री सतीशन यांची पंतप्रधान मोदींशी भेट

'डॉन ३'च्या वादानंतर रणवीर सिंग विरोधात असहकार आदेश; काय आहे प्रकरण?

संरक्षण मंत्रालयाच्या योजनेनुसार भारतीय हवाई दलातील २५८ सुखोई-३० एमकेआय विमानांमध्ये ही अत्याधुनिक प्रणाली बसवण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये भारताची स्वदेशी NaVIC प्रणालीसह GPS, GLONASS, Galileo, BeiDou आणि GAGAN यांसारख्या अनेक जागतिक सॅटेलाइट नेटवर्कचा समावेश असेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विमानांना अचूक लोकेशन डेटा आणि दिशा मिळत राहणार आहे. युद्धकाळात शत्रूकडून सॅटेलाइट सिग्नलमध्ये हस्तक्षेप झाला तरीही ही प्रणाली कार्यरत राहील, असा दावा करण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे ३०० अत्याधुनिक अँटेना प्रणाली, ५० फील्ड लेव्हल टेस्टर्स आणि १० बेस लेव्हल टेस्टर्स पुरवले जाणार आहेत. सुरुवातीला दोन विमानांवर या प्रणालीची चाचणी केली जाईल आणि त्यानंतर संपूर्ण ताफ्यात तिची स्थापना करण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातील तांत्रिक कर्मचाऱ्यांना यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे. ही प्रणाली अत्यंत कठीण परिस्थितीतही प्रभावी राहील, अशी माहिती देण्यात आली आहे. सुमारे २१ किलोमीटर उंचीवर, माख १.५ वेगाने आणि प्रचंड दाबाच्या परिस्थितीतही ती सुरळीतपणे काम करू शकणार आहे.

दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या 'सुपर सुखोई' अपग्रेड कार्यक्रमाचा हा महत्त्वाचा भाग मानला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सुखोई विमानांमध्ये नवीन AESA रडार, आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली, अत्याधुनिक क्षेपणास्त्र क्षमता आणि मोठ्या प्रमाणावर स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाची मारक क्षमता आणि रणनीतिक ताकद आणखी वाढणार असून पुढील अनेक दशकांपर्यंत सुखोई विमाने भारतीय सुरक्षेचा मजबूत कणा राहतील, असा विश्वास संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka