राष्ट्रपती दिसानायकेंची राजनाथ सिंह यांना ग्वाही
भारत आणि श्रीलंकेतील संरक्षण आणि सामरिक संबंध अधिक मजबूत होत असतानाच श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी भारताला महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोलंबोमध्ये राष्ट्रपती दिसानायके यांची भेट घेतली. यावेळी श्रीलंकेची भूमी भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कारवायांसाठी वापरू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिसानायके यांनी दिली. हिंद महासागरातील श्रीलंकेचे भौगोलिक आणि सामरिक महत्त्व तसेच या भागातील चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर हे आश्वासन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
या भेटीदरम्यान भारत आणि श्रीलंकेने संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे करार केले. श्रीलंकेच्या हवाई दलातील सहा एल-७० हवाई संरक्षण तोफांचे भारताकडून आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय भारत आणि श्रीलंकेच्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सहकार्य, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून युवकांची देवाणघेवाण वाढवण्याबाबतही सामंजस्य करार करण्यात आले. या सहकार्यामुळे श्रीलंकेची संरक्षण क्षमता वाढण्याबरोबरच दोन्ही देशांमधील लष्करी आणि संस्थात्मक संबंध अधिक दृढ होणार आहेत.
काँग्रेसच्या कामपिसाट खासदाराच्या विरोधात जेएनयुच्या विद्यार्थिनींची तक्रार
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी श्रीलंकेला संकटाच्या काळात मदत करणे हा भारताचा उपकार नसून जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. 'ऑपरेशन सागर बंधू'अंतर्गत भारताने श्रीलंकेला दिलेली मदत आणि पुनर्वसनासाठी केलेले सहकार्य याबद्दल राष्ट्रपती दिसानायके यांनी भारताचे आभार मानले. दोन्ही देशांनी स्वतःला 'सभ्यतागतदृष्ट्या जवळचे, शेजारी आणि सागरी भागीदार' संबोधत हिंद महासागर क्षेत्रातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

