Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय शेअर बाजारात परदेशी पैसा खुळखुळला

भारतीय शेअर बाजारात परदेशी पैसा खुळखुळला

NEWS डंका 2 weeks ago

गस्टच्या पहिल्याच आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून १२,९२१ कोटींची खरेदी

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास पुन्हा वाढताना दिसत आहे. सलग चार महिने मोठ्या प्रमाणात विक्री केल्यानंतर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जुलैपासून भारतीय शेअर्समध्ये पुन्हा खरेदी सुरू केली असून ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी तब्बल १२ हजार ९२१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

याआधी जुलै महिन्यातही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सुमारे २० हजार २०० कोटी रुपये गुंतवले होते. त्यामुळे भारतीय बाजारात परदेशी पैशाचा ओघ पुन्हा वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

जुलैपूर्वी सलग चार महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेत होते. जूनमध्ये त्यांनी ४९ हजार ३४० कोटी रुपये, मेमध्ये ३२ हजार ९६३ कोटी रुपये, तर एप्रिलमध्ये तब्बल ६० हजार ८४७ कोटी रुपयांची विक्री केली होती. मार्चमध्ये तर परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा विक्रम नोंदवत तब्बल १ लाख १७ हजार कोटी रुपये भारतीय बाजारातून बाहेर काढले होते. फेब्रुवारीमध्ये मात्र त्यांनी २२ हजार ६१५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. या मोठ्या विक्रीमुळे २०२६ वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे २ लाख ४१ हजार कोटी रुपये काढले आहेत.

हैदराबादच्या नालसारच्या विद्यार्थ्यांकडून सरन्यायाधीश सूर्यकांत यांना विरोध

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर चिखल-बूटफेक?

भारतीय संघाला दिलासा, शुभमन गिलने सुरू केला सराव

मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. अमेरिकेत व्याजदर कपातीच्या वाढलेल्या शक्यतेमुळे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाई, भारतीय रुपयातील स्थिरता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची सकारात्मक स्थिती यामुळे भारत पुन्हा परदेशी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वाढ आणि महागाईबाबत व्यक्त केलेले सकारात्मक अंदाजही गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांचा कल काही विशिष्ट क्षेत्रांकडेही वाढताना दिसत आहे. वाहन उद्योग, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणुकीची आवड वाढत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे परदेशी गुंतवणूकदार केवळ शेअर बाजारातच पैसा लावत नाहीत, तर कर्जरोखे आणि रोखे बाजारातही गुंतवणूक करत आहेत. ऑगस्टमध्ये आतापर्यंत त्यांनी सर्वसाधारण मार्गाने रोखे बाजारात सुमारे ६२२ कोटी रुपये गुंतवले आहेत.

२०२५ मध्येही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सुमारे १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची विक्री केली होती. त्यामुळे २०२६ मध्ये सुरुवातीला झालेल्या मोठ्या विक्रीनंतर आता सलग दोन महिन्यांपासून खरेदीचा कल दिसणे भारतीय बाजारासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. भारतीय शेअर्समधील परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा अजूनही तुलनेने कमी असल्याने पुढील काळात परदेशी पैशाचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

मात्र हा कल कायम राहण्यासाठी जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिकेतील व्याजदर, कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाची हालचाल आणि भारतीय कंपन्यांची आर्थिक कामगिरी हे घटक निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे सध्या परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे पुन्हा वळले असले, तरी आगामी काळातील जागतिक घडामोडींवर या गुंतवणुकीचा वेग अवलंबून राहणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka