Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भावूक झाला किंग कोहली!

भावूक झाला किंग कोहली!

NEWS डंका 3 weeks ago

यपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आणि इतिहास रचला. या ऐतिहासिक यशानंतर आरसीबीचा सर्वात मोठा आधारस्तंभ विराट कोहली भावूक झाला.

संघाने विजेतेपद कायम राखल्यानंतर कोहलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत गेल्या वर्षीच्या प्रवासाची आठवण करून दिली.

कोहलीने 'एक्स'वर लिहिले, 'गेल्या वर्षी आम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला होता… आपण सलग दोनदा विजेते होऊ शकतो का? आणि आज आम्ही ते पुन्हा करून दाखवलं.'

हे शब्द केवळ एका पोस्टमधील वाक्य नव्हते, तर आरसीबीच्या मेहनतीचा, आत्मविश्वासाचा आणि जिद्दीचा सार होता.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने आपल्या नावाला साजेशी खेळी करत आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. वेंकटेश अय्यरसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी अवघ्या २७ चेंडूत ६२ धावांची भागीदारी करत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली.

कोहली सुरुवातीपासूनच भन्नाट लयीत दिसत होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. अवघ्या २५ चेंडूंमध्ये पन्नास धावा पूर्ण करत त्याने गुजरातच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

विराटने ४२ चेंडूत नाबाद ७५ धावा ठोकल्या. तब्बल १७८ च्या स्ट्राइक रेटने खेळताना त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याला टिम डेविडनेही साथ दिली. डेविडने १७ चेंडूत २४ धावा करत विजय सोपा केला.

फलंदाजांपूर्वी आरसीबीच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत केली होती. गुजरात टायटन्सला त्यांनी १५५ धावांवर रोखले.

जीटीकडून वॉशिंग्टन सुंदरने एकहाती झुंज देत ३७ चेंडूत ५० धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.

आरसीबीसाठी रसिख सलाम हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत २७ धावा देत ३ बळी घेतले. भुवनेश्वर कुमारने २९ धावांत २ विकेट्स, तर जोश हेझलवूडनेही २ बळी घेत गुजरातच्या फलंदाजीचा कणा मोडला.

या विजयासह आरसीबी आयपीएलच्या इतिहासात सलग विजेतेपद राखणारा तिसरा संघ ठरला. यापूर्वी ही किमया फक्त चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी साधली होती.

आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहली आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने १६ सामन्यांत १६५ च्या स्ट्राइक रेटने ६७५ धावा फटकावल्या. अंतिम सामन्यातील त्याची खेळी म्हणजे संपूर्ण हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीवर उमटलेला सुवर्णमोहोरच ठरली.

आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा फक्त आणखी एक किताब नाही, तर वर्षानुवर्षे पाहिलेल्या स्वप्नांची सलग दुसऱ्यांदा झालेली पूर्तता आहे. आणि या स्वप्नाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा होता… किंग कोहली!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka