Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चायना मास्टर्समध्ये श्रीकांतचा प्रवास संपला

चायना मास्टर्समध्ये श्रीकांतचा प्रवास संपला

NEWS डंका 1 month ago

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याचा चायना मास्टर्समधील प्रवास संपुष्टात आला. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हाँगकाँगच्या ली चेउक यियूकडून पराभव झाल्याने श्रीकांतचे स्पर्धेतील आव्हान संपले.

शेन्झेन एरिनामध्ये झालेल्या सामन्यात लीने श्रीकांतचा २१-१६, २१-१६ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. तब्बल तीन वर्षांनंतर श्रीकांतने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ७५० किंवा त्यापेक्षा मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र, या पराभवामुळे भारताच्या पदकाच्या आशेलाही मोठा धक्का बसला.

ली चेउक यियूविरुद्ध श्रीकांतचा हा सलग चौथा पराभव ठरला. या दोघांमधील आतापर्यंतच्या लढतीत श्रीकांतला केवळ २०१८ इंडोनेशिया ओपनच्या पहिल्या फेरीत विजय मिळवता आला आहे.

श्रीकांतने या स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत त्याने चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीतील २१व्या क्रमांकाच्या ची यू-जेनचा अवघ्या ३५ मिनिटांत २१-१६, २१-१५ असा पराभव केला. त्यानंतर प्री-क्वार्टर फायनलमध्ये श्रीकांतने कॅनडाचा जागतिक क्रमवारीतील नवव्या क्रमांकाचा आणि नुकत्याच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता व्हिक्टर लाई याला २१-१८, २१-१९ असे हरवत मोठा धक्का दिला होता.

दरम्यान, भारताची पदकाची आशा आता सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीवर आहे. सुपर ७५० स्पर्धेत भारताचे आव्हान कायम ठेवणारी ही एकमेव भारतीय जोडी असून, उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांचा सामना डेन्मार्कच्या किम अॅस्ट्रुप आणि अँडर्स स्कारुप रासमुसेन यांच्याशी होणार आहे.

याआधी भारतीय जोडीने फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्ह आणि क्रिस्टो पोपोव्ह यांचा २१-१७, २२-२४, २१-९ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

भारताचे महिला एकेरीतील आव्हान गुरुवारीच संपले. तन्वी शर्मा हिला जपानच्या तोमोका मियाझाकीकडून २१-१७, १८-२१, २१-१६ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनीषा क्रॅस्टो यांनाही चायनीज तैपेईच्या लियू कुआंग-हेंग आणि सू यिन-हुई यांच्याकडून दुसऱ्या फेरीत २१-१८, २१-१८ असा पराभव स्वीकारावा लागला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka