आरक्षणाच्या मुद्द्यावर एनडीएमध्ये ठिणगी
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर एनडीएमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी आणि त्यांचे पुत्र संतोष सुमन यांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला आहे.
अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात उप-कोटा आणि क्रीमी लेयरच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.
संतोष सुमन यांनी एससी-एसटी आरक्षणाचा लाभ समाजातील सर्वात मागासलेल्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण आणि उप-कोट्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आरक्षणाचा मोठा फायदा काही मोजक्या जातींनाच मिळत असल्याने मुसहरसह इतर मागासलेल्या दलित समाजांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा त्यांचा दावा आहे.
कामगिरीवर लक्ष द्या, निवडकर्ते स्वतः शोधत येतील!
मात्र चिराग पासवान यांनी ही भूमिका फेटाळून लावली आहे. त्यांच्या मते, दलितांना आरक्षण आर्थिक परिस्थितीमुळे नव्हे, तर अनेक वर्षांच्या सामाजिक भेदभाव आणि अस्पृश्यतेमुळे मिळाले आहे. त्यामुळे एससी आरक्षणात क्रीमी लेयर किंवा उप-कोट्याची तरतूद केल्यास दलित समाजात फूट निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.
चिराग पासवान यांनी या मुद्द्यावरून मांझी पिता-पुत्रावर थेट निशाणा साधत, आरक्षणाच्या व्यवस्थेत बदल हवा असेल तर आधी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये निवडणुकीआधीच एनडीएतील अंतर्गत राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आरक्षणाचा मुद्दा आता केवळ सामाजिक न्यायापुरता मर्यादित न राहता बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचा निवडणूक मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

