भारतीय महिला क्रिकेटपटू हरलीन देओल हिचा विमेन्स कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूसीपीएल) खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित सामन्यांसाठी हरलीनचा बार्बाडोस ट्रायडेंट्स संघात समावेश करण्यात आला असून, या स्पर्धेत खेळणारी ती पाचवी भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.
ट्रायडेंट्स संघात ती पूजा वस्त्राकर आणि किरण नवगिरे यांच्यासोबत खेळणार आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी टी-२० लीगमधील हरलीनचा हा पहिलाच अनुभव आहे.
भारताच्या २०२५ वनडे विश्वचषक विजेत्या संघाची सदस्य असलेल्या हरलीनने सांगितले की, ट्रायडेंट्सकडून आलेले निमंत्रण अगदी अचानक होते. ''मला विचारण्यात आले की, तुला डब्ल्यूसीपीएल खेळायची आहे का? मी लगेच होकार दिला. इथले वातावरण, खेळपट्टी आणि लोक सगळेच वेगळे आहेत. फ्रँचायझी क्रिकेटचा अनुभवही वेगळा आहे. त्यामुळे हा अनुभव घेण्यासाठी मी लगेच होकार दिला आणि येथे आले,'' असे तिने सांगितले.
दोन दिवसांपूर्वीच कॅरेबियनमध्ये दाखल झालेल्या हरलीनने आतापर्यंत केवळ एका सराव सत्रात सहभाग घेतला आहे. संघातील खेळाडूंसोबत क्रूझवर आयोजित करण्यात आलेल्या बॉन्डिंग कार्यक्रमाचाही तिने आनंद घेतला.
डब्ल्यूसीपीएलमध्ये खेळताना कोणतेही अतिरिक्त दडपण घेण्याचा आपला विचार नसल्याचे हरलीनने स्पष्ट केले. ''मला फक्त मोकळेपणाने खेळायचे आहे. मी कुठेही खेळत असले तरी माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असते. जास्त विचार करण्यापेक्षा आपले १०० टक्के योगदान देऊन खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे,'' असे ती म्हणाली.
शनिवारी जमैका एम्प्रेसविरुद्ध ट्रायडेंट्सचा सामना होणार असून, या सामन्यातून कॅरेबियनमधील परिस्थितीचा अंदाज येईल, असे हरलीनने सांगितले. ''मी येथे अद्याप सामना खेळलेला नाही. त्यामुळे मैदानावर उतरल्यानंतरच परिस्थिती कशी आहे, हे समजेल,'' असे तिने स्पष्ट केले.
डब्ल्यूपीएल तसेच यापूर्वीच्या विमेन्स टी-२० चॅलेंजमधील अनुभवामुळे फ्रँचायझी क्रिकेटचे महत्त्व हरलीनला चांगलेच ठाऊक आहे. वेगवेगळ्या संघांतील आणि देशांतील खेळाडूंसोबत खेळताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात, असे तिने सांगितले.
''नव्या संघात किंवा परदेशी लीगमध्ये खेळताना नवीन खेळाडू, वेगळे वातावरण आणि वेगळी परिस्थिती यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणे हीच एक मोठी शिकण्याची संधी असते,'' असे हरलीन म्हणाली.
फ्रँचायझी क्रिकेटमुळे तांत्रिक बदल करण्यापेक्षा खेळाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो, असेही तिने स्पष्ट केले. ''इतर खेळाडू कोणत्या भागात चेंडू खेळतात, त्यांची विचार करण्याची पद्धत काय आहे, हे शिकता येते. मात्र, त्यामुळे तंत्रात मोठे बदल करणे आवश्यक नसते,'' असे तिने सांगितले.
टी-२० क्रिकेटच्या अनिश्चित स्वरूपामुळे भविष्यातील निकालांचा अधिक विचार करण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याचे हरलीनने सांगितले. ''खूप पुढचा विचार केला तर अपेक्षांचे ओझे वाढते आणि निराशाही होऊ शकते. त्यामुळे मी एकावेळी एका दिवसाचा आनंद घेण्यावर विश्वास ठेवते,'' असे ती म्हणाली.
डब्ल्यूसीपीएलमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंसोबत खेळण्याची आणि नवे अनुभव घेण्याची संधी मिळाल्याबद्दल हरलीनने आनंद व्यक्त केला. ''मला येथे खेळण्याची संधी मिळाली, याबद्दल मी खरोखरच आभारी आहे. आता या अनुभवाचा आनंद घेण्याची मी वाट पाहत आहे,'' असे तिने सांगितले.

