पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांसमोर राजनाथ सिंह यांचा इशारा
दहशतवादाचे समर्थन होऊ शकत नाही आणि त्याचा सामना करण्याबाबतीत दुटप्पीपणा असू शकत नाही, असा स्पष्ट संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य देशांच्या सरकारप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. विशेष म्हणजे, त्यांच्या भाषणावेळी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार हेही उपस्थित होते.
राजनाथ सिंह यांनी दहशतवादाला शांतता आणि विकासासमोरील गंभीर धोक्यांपैकी एक असल्याचे म्हटले. दहशतवादामुळे केवळ निरपराध नागरिकांचे जीव जात नाहीत, तर गुंतवणूक आणि व्यापारावरही प्रतिकूल परिणाम होतो. तसेच, समाजात कट्टरतावाद वाढतो आणि तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळण्यात अडथळे निर्माण होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवादाचा सामना करताना दुहेरी निकष ठेवता कामा नयेत. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणारे, त्यांना पाठिंबा देणारे किंवा सुरक्षित आश्रय देणारे यांनाही मोकळीक मिळता कामा नये, असे राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले. दहशतवादाची संपूर्ण यंत्रणा सामूहिक आणि ठोस प्रयत्नांतून मोडून काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार उपस्थित असताना राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका मांडली. पाकिस्तानवर दहशतवादाला पाठिंबा दिल्याचे आरोप भारत करत आला आहे. अशा पार्श्वभूमीवर सिंह यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानमधून भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला आणखी कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता.
पहलगाम हल्ल्याच्या तुलनेवरून वाद; वर्षभराने सोनू निगमची माफी
एशियन पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत भारताचा डबल धमाका! रिंकूला सुवर्ण, अजित सिंहला रौप्य
प्रज्ञान ओझा टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ते
अधारिका फाउंडेशनच्या 'नवदुर्गा पुरस्कारां'नी नऊ दृष्टिहीन महिलांचा गौरव
दुशान्बे येथील बैठकीत राजनाथ सिंह यांनी दहशतवादाचा मुद्दा मांडण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावरही भर दिला. २०२६ ते २०३० या कालावधीतील बहुपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमाच्या कृती आराखड्याला भारताचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्य देशांमधील व्यापारवाढ, गुंतवणूक आणि मजबूत पुरवठा साखळी यांसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

