Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डावे चळ राज ठाकरेंच्या डोक्यात कसे शिरले?

डावे चळ राज ठाकरेंच्या डोक्यात कसे शिरले?

हाराष्ट्रातील जनतेने बरीच वर्षे राज ठाकरे यांच्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रतिमा पाहीली. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर हिंदुत्वाची भगवी शाल, रुद्राक्ष माळा अभिमानाने मिरवली. हिंदुत्वाबाबत राज ठाकरेंचे कभी हा, कभी ना चाललेले असते.

सध्या ते हिंदुत्वाकडे पाठ फिरवून विरुद्ध दिशेला धावताना दिसतायत. भारतातील प्रत्येक राज्य हा एक देश होता. भारत १९४७ मध्ये निर्माण झाला, असे बेधडक वक्तव्य ठाकरेंनी एका मुलाखतीत केले आहे. हे त्यांच्या समर्थकांसाठी सुद्धा धक्कादायक आहे. कधी काळी डाव्या विचारवंतांनी हा सिद्धांत भारतीय जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रय़त्न केला. तो अपयशी ठरलाच, शिवाय डावे देशाच्या राजकारणातून पूर्णपणे अस्तंगत झाले.

विष्णू पुराण द्वीतीय अंश, अध्याय ३, श्लोक १

उत्तरं यत्समुद्रस्य: हिमाद्रेश्र्चैव दक्षिणं

वर्षं तद् भारतं नाम: भारती यत्र संतती

विष्णू पुराणाची रचना महर्षी व्यासांचे वडील ऋषी पराशर यांनी केली आहे. हा काळ साधारण द्वापार युगाच्या अखेरीस आणि कलियुगाच्या सुरुवातीचा मानला जातो. इसवीसन पूर्व ३१००. हा काळ नेमका कोणता असावा याबाबत मतभेद असू शकतात. परंतु विचारवंताचा आव आणत राज ठाकरेंनी केलेले वक्तव्य म्हणजे निव्वळ बकवास आहे, हे यातून सिद्ध व्हावे.

हा बाळासाहेबांचा विचार नक्कीच नाही. कम्युनिस्टांनी हा विचार भारतात पेरण्याचा जोरदार प्रय़त्न केला. १९४० मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे सरचिटणीस पी.सी.जोशी यांनी ब्रिटीशांच्या क्रिप्स कमिशनला दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, भारत एक राष्ट्र नसून अनेक राष्ट्रीयत्वांचे एक कुटुंब आहे.

केरळचे पहीले मार्क्सवादी मुख्यमंत्री ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांनी द नॅशनल इक्वेशन इन केरळ या पुस्तकात भारत हा बहुराष्ट्रीय देश आहे. आधी ब्रिटीशांनी आणि नंतर भारतातील सत्ताधारी वर्गाने अशा एका भूभागावर एक शासकीय व्यवस्था लादण्याचा प्रय़त्न केला जो मुळात विविध भाषिक आमि सांस्कृतिक राष्ट्रीयत्वांचा एक उपखंड आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात भारत हा बहु राष्ट्रीय, बहुभाषिक आमि बहु सांस्कृतिक समाज आहे. भारताकडे हिंदू राष्ट्राच्या चष्म्यातून पाहणे म्हणजे भारत हा विविध भाषिक राष्ट्रीयत्वाचा संघ आहे, या ऐतिहासिक सत्याला नकार देणे होय.

अरुंधती रॉय या पाकिस्तान प्रेमी डाव्या विचारसरणीच्या लेखिका म्हणतात, भारत हे राष्ट्र नाही, तो एक उपखंड आहे. ब्रिटीशांनी निर्माण केलेले एक कृत्रिम राज्य आहे जे केवळ लष्कर, नोकरशाही आणि कॉर्पोरेट जगाच्या बळावर एकत्र टिकून आहे. हा विचार ब्रिटीशांनाही सोयीचा होता. म्हणून पेरी एंडरसन यांच्यासारख्या मार्क्सवादी इतिहासकारांनी याची री ओढली.

हा विचार सतत भारतीयांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न डाव्यांनी केला. राज ठाकरे आज या मंडळींच्या पंक्तित जाऊन बसले आहेत.

राज ठाकरे यांना मराठी मतांची मोट बांधून राजकारण करायचे आहे. त्यात काही वाईटही नाही. त्यांनी ते जरुर करावे, परंतु देशाबाबत जो विचार त्यांनी मांडलेला आहे, तो विचार मराठी माणूस कधीच स्वीकारणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास तसा नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्याचे स्वप्न पाहीले नाही, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहीले. राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यांना रामायण, महाभारताच्या कथा ऐकवल्या. या दोन्ही गोष्टी प्रादेशिक नाही. छत्रपतींची प्रेरणा कधीच महाराष्ट्रापुरती मर्यादीत नव्हती. म्हणूनच मराठे अटकेपर्यंत गेले. पानिपतावर सव्वा लाख मराठ्यांनी लढता लढता देह ठेवला तो काय महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी नाही, त्यांना हिमालयाचे रक्षण करायचे होते.

प्रत्येक प्रदेशाची भाषा वेगळी असेल, परंतु इथली संस्कृती एकच आहे. ती सनातन संस्कृती आहे. मराठी माणसालाही अखेरच्या घटकेत मोक्षासाठी गंगाजल लागते, कितीही पवित्र असले तरी त्याच्या मुखात नर्मदेचे पाणी ओतले जात नाही. चार धाम, ५१ शक्तीपीठ हा केवळ आध्यात्मिक

वारसा नाही. देश जोडणारे ते बिंदू आहेत.

महाराष्ट्र हा देश असता, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शाळकरी वयात भारत मातेची मूर्ति स्थापन केली नसती, महाराष्ट्र मातेची केली असती. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना करताना संघटनेचे नाव त्यांनी अभिनव भारत न ठेवता अभिनव महाराष्ट्र ठेवले असते. लोकमान्य टिळक जेव्हा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी गर्जना केली तेव्हा त्यांना हे स्वराज्य महाराष्ट्रापुरते मर्यादीत नव्हते. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हटले जाते. त्यांनी जेव्हा चले जावचे आंदोलन छेडले, ते काय गुजरात मधून ब्रिटीशांनी बाहेर पडावे म्हणून नाही.

वंदेमातरमच्या रचनेचे १५० वे वर्षे आपण साजरे करीत आहोत. जर राज ठाकरे यांच्या वक्तव्याप्रमाणे भारत हा एक देश नव्हता आणि त्याची निर्मिती १९४७ पर्यंत झालीच नव्हती तर बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी मातृभूमीची दशभुजाधारी भारत मातेच्या स्वरुपात कल्पना करून या वंदे मातरम गीताची रचना का केली. राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवायचा तर बंकीमचंद्रांसमोर भारत नव्हता फक्त बंगाल होता. हे सत्य असते तर देशभरातील क्रांतिकारक वंदेमातरमच्या घोषणा देत फासावर का लटकले असते. वंदे मातरम हा स्वातंत्र्य चळवळीतला महामंत्र बनला. कारण ज्या दशभुजाधारी देवीची कल्पना केली होती, ती महाराष्ट्राला तुळजाभवानी म्हणून आसामला कामाख्या म्हणून, त्रिपुरामध्ये त्रिपुरा सुंदरी म्हणून बंगालला दुर्गा म्हणून, गुजरातला अंबामाता म्हणून परीचित होती.

इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत महाराष्ट्राचे सुपुत्र शिवराम राजगुरु आणि पंजाबचे सुपुत्र भगतसिंग आणि सुखदेव फासावर लटकले ते काय पंजाब आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी? राज ठाकरेंनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे म्हणजे प्रत्येक राज्य हे राष्ट्र होते हे आम्ही मान्य करतो. प्रत्येक प्रदेशातील राज्य व्यवस्था स्वतंत्र असू शकेल परंतु त्याही काळात महाराष्ट्रातील भाविक काशी यात्रा करायचा. गंगास्नान करायचा. भाषा हाच जर राष्ट्राला जोडणारा धागा असेल तर मग आयर्लंडला ब्रिटनपासून वेगळे काय व्हायचे आहे? रशियाची शकले कशी झाली? सर्व भारतीय भाषा या संस्कृतोद्भव आहेत, हे राज ठाकरे यांना ठाऊक नाही का? महाराष्ट्र जर मराठी भाषेमुळे एकत्र आहे, परंतु वेगळेपण शोधण्याचा हट्ट असेल तर एकट्या विरारचे उदाहरण घ्या. इथला सोमवंशी क्षत्रिय समाज, वंजारी समाज, कोळी समाज प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. इतकी वेगळी की कान देऊन ऐकल्यावरही अनेक शब्द तुमच्या डोक्यावरून जातात.

हा देश एकच आहे, एकच होता. तो एकच आहे, म्हणून गुजरातच्या गोध्रामध्ये जेव्हा ट्रेनमध्ये कारसेवकांना जाळण्यात येते, तेव्हा देशभरात संतापाचा आगडोंब उसळतो. काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा देशभरातील जनतेच्या काळजाला चटका बसतो.

सुब्रमण्यम भारती कोणाले नावाचे कर्नाटकातील ब्राह्मण गृहस्थ माझे मित्र आहेत. अचानक त्यांना त्यांच्या कुटुंबाचे मूळ शोधण्याचा विचार त्यांच्या मेंदूत शिरला. त्यांनी हा शोध सुरू केला. त्यांचा हा शोध संपला, बिहारमध्ये. कर्नाटकच्या कानडी ब्राह्मणाचे मूळ बिहारमध्ये सापडले. ते आज हिंदी बोलत नाहीत. कानडी त्यांची मातृभाषा बनली आहे. ठाकरेंचे मूळही तिथेच आहे. तेही गेली काही दशके मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राजकारण करतायत. मराठी त्यांचीही मातृभाषा बनली आहे. हे शक्य झाले कारण १९४७ पूर्वीही त्यांचा देश महाराष्ट्र किंवा बिहार नव्हता. तो भारतच होता. त्यामुळे स्वस्त आणि सवंग राजकारणासाठी आमच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह लावताना त्यांनी शंभरवेळा विचार करावा.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka