आजपासून प्रतिकिलो ३ रुपये ८९ पैशांची वाढ
दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात तब्बल ३ रुपये ८९ पैशांची वाढ झाल्याने वाहनधारकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ही दरवाढ २९ ऑगस्टपासून लागू केली असून, दिल्लीत सीएनजीचा दर ८३ रुपये ०९ पैशांवरून ८६ रुपये ९८ पैसे प्रतिकिलो झाला आहे.
गुरुग्राममध्ये हा दर ९२ रुपये ०१ पैसे, तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये ९५ रुपये ५९ पैसे प्रतिकिलो झाला आहे.
या दरवाढीमागे पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय एलएनजीच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे प्रमुख कारण असल्याचे आयजीएलने स्पष्ट केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीवर निर्माण झालेला दबाव आणि जागतिक बाजारातील पुरवठ्याबाबतची अनिश्चितता यामुळे स्पॉट एलएनजी महागला आहे. सीएनजीसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा मोठा हिस्सा आयातीत एलएनजीमधून येत असल्याने त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या इनपुट खर्चावर झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा काही भाग भरून काढण्यासाठी ही नियंत्रित दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
वेलनेस रिट्रीटमध्ये योग-ध्यानासोबत 'हेल्दी फूड'चीही क्रेझ!
पॅकेज्ड फूडवर आता समोरच दिसणार 'जास्त साखर', 'जास्त मीठा'ची चेतावणी?
दरम्यान, मुंबईत सध्या सीएनजीचा दर ८६ रुपये प्रतिकिलो आहे. महानगर गॅस लिमिटेडने मे महिन्यात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील सीएनजीचा दर ८६ रुपये झाला होता आणि त्यानंतर तो स्थिर आहे. त्यामुळे सध्या दिल्लीतील नवीन सीएनजी दर आणि मुंबईतील दर जवळपास समान पातळीवर आले आहेत.
सीएनजीच्या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम रिक्षा, टॅक्सी, कॅब, बस आणि व्यावसायिक वाहनचालकांवर होणार आहे. इंधन खर्च वाढल्याने वाहनांच्या दैनंदिन चालू खर्चात वाढ होणार असून, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही वाढ आणखी एक आर्थिक भार ठरू शकते.

