Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्ली-वाराणसीदरम्यान धावणार स्लीपर वंदे भारत

दिल्ली-वाराणसीदरम्यान धावणार स्लीपर वंदे भारत

NEWS डंका 1 month ago

दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वे प्रवाशांना मोठी भेट

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. दिल्ली आणि वाराणसीदरम्यान रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची योजना रेल्वेने आखली आहे.

प्रस्तावित ट्रेन प्रयागराज आणि कानपूर मार्गे धावणार असून, त्यामुळे दिल्ली, कानपूर, प्रयागराज आणि वाराणसी या महत्त्वाच्या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना वेगवान आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे. ही सेवा दिवाळीच्या आसपास सुरू करण्याचे रेल्वेचे नियोजन असल्याचे वृत्त आहे. या ट्रेनच्या चाचण्या सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, रेल्वे बोर्डाने अद्याप ट्रेन क्रमांक, अधिकृत भाडे किंवा नियमित सेवा सुरू होण्याची अंतिम तारीख जाहीर केलेली नाही.

प्रस्तावित वेळापत्रकानुसार वाराणसी कॅन्ट येथून ही स्लीपर वंदे भारत रात्री ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी प्रयागराजला पोहोचेल. त्यानंतर रात्री १२ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास ट्रेन कानपूर सेंट्रलमार्गे पुढे जाईल आणि सकाळी ५ वाजता नवी दिल्लीला पोहोचण्याचे नियोजन आहे. परतीच्या प्रवासात नवी दिल्लीहून रात्री ९ वाजून २० मिनिटांनी ट्रेन सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता वाराणसीला पोहोचण्याचे प्रस्तावित वेळापत्रक आहे. त्यामुळे दिवसभराचा वेळ वाचवून रात्री प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना मिळू शकते.

द्वादशम तू गजानन, १२ नावांची कथा!

मयूरेश्वरा, तुझा महिमा कसा ?

भाजपाने नव्हे, ममता, पवारांनीच पक्ष फोडले

या स्लीपर वंदे भारतचा वेग ताशी १३० ते १६० किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष वेग हा रेल्वे मार्गाची स्थिती, चाचण्यांचे निष्कर्ष आणि आवश्यक ऑपरेशनल मंजुरीवर अवलंबून असेल. वेग वाढल्यास दिल्ली-वाराणसी मार्गावरील प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे ही १६ डब्यांची ट्रेन असण्याची शक्यता असून, त्यामध्ये एकूण ८२३ बर्थ असतील. प्रस्तावित संरचनेनुसार ११ एसी थ्री-टियर, ४ एसी टू-टियर आणि १ फर्स्ट एसी कोचचा समावेश असेल. वंदे भारत मालिकेतील आधुनिक सुविधाही या ट्रेनमध्ये उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे.

दिल्ली आणि वाराणसीदरम्यान आधीच रेल्वे वाहतुकीचे मोठे जाळे आहे. मात्र रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत सुरू झाल्यास या मार्गावर प्रवाशांना आणखी एक आधुनिक पर्याय मिळणार आहे. विशेषतः कानपूर आणि प्रयागराजसारख्या महत्त्वाच्या शहरांना या सेवेमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रात्रीच्या वेगवान ट्रेनची सुविधा महत्त्वाची ठरू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka