महिला आशिया कप २०२६ मध्ये भारतीय संघाने थायलंडचा तब्बल ९४ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली. भारताच्या या दणदणीत विजयात दीप्ती शर्माने गोलंदाजीने मोलाची भूमिका बजावली आणि त्याचबरोबर ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला.
दीप्तीने अवघ्या १.१ षटकांत एकही धाव न देता ३ बळी घेतले. या कामगिरीसह ती महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. दीप्तीच्या नावावर आता १७१ बळी झाले आहेत. तिने थायलंडची गोलंदाज थिपाचा पुथावोंगला मागे टाकले. पुथावोंगच्या नावावर १७० बळी आहेत. रवांडाची हेन्रिएट इशिम्वे १६४ बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इतकेच नव्हे, तर भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३ किंवा त्याहून अधिक बळी घेताना सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा स्पेल करण्याचा विक्रमही दीप्तीने केला. तिने एकही धाव न देता ३ बळी घेतले. यापूर्वी हा विक्रम रेणुका सिंहच्या नावावर होता. रेणुकाने २०२२ मध्ये ५ धावा देत ३ बळी घेतले होते.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ गडी गमावून १५९ धावा केल्या. शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी करत ६४ धावा ठोकल्या. प्रतिका रावलने २२ धावा, तर स्मृती मंधानाने १९ धावा केल्या. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौर (५), भारती फुलमाळी (१३) आणि दीप्ती शर्मा (५) यांना मोठी खेळी करता आली नाही. ऋचा घोष खाते न उघडताच बाद झाली.
१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडचा संपूर्ण संघ अवघ्या ६५ धावांत गारद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने ३, नंदनी शर्माने ३, तर श्री चरणीने २ बळी घेतले. त्यामुळे भारताने तब्बल ९४ धावांनी विजय मिळवत आशिया कपच्या अभियानाची दणदणीत सुरुवात केली.

