Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'ड्रग्ज माफियांना पाताळातून शोधून बाहेर काढू'

'ड्रग्ज माफियांना पाताळातून शोधून बाहेर काढू'

अमित शहांचा पंजाबमधील नशेच्या व्यापाऱ्यांना कठोर इशारा

पंजाबमधील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला असून, अमली पदार्थांच्या तस्करांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा कठोर इशारा दिला आहे.

'ड्रग्ज माफियांना पाताळातून शोधून बाहेर काढू,' असा निर्धार व्यक्त करत शहा यांनी पंजाबला नशामुक्त करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. पंजाबमध्ये 'चिट्टा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमली पदार्थाच्या विळख्यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, तरुण पिढीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. या समस्येचे गांभीर्य प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी शाह यांनी २० ऑक्टोबर रोजी पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येने प्रभावित झालेल्या कुटुंबांची भेट घेतली. या भेटीदरम्यान समोर आलेले अनुभव वेदनादायक असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना शहा यांनी त्यांचे दुःख जाणून घेतले. गुरदासपूर येथे बिक्रमजीत सिंह यांच्या कुटुंबीयांची, संगरूरमध्ये गुलजार सिंह यांच्या कुटुंबीयांची आणि मानसा येथे परविंदर सिंह झोटा यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. अमली पदार्थांच्या कथित अवैध विक्रीला विरोध केल्यामुळे नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे आरोप या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पुढे आले आहेत. परविंदर सिंह झोटा यांची १३ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे पंजाबमधील अमली पदार्थांचा व्यापार आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय पंजाब सरकारने जाहीर केला आहे.

सूरमाचा सुवर्णधडाका, राम रतनची रौप्यभरारी

दीप्तीची सुवर्णधाव; आशियाई विक्रमासह भारताचा डंका

दिवाळीपर्यंत कॉक्रोच आंदोलनाला ब्रेक

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित करत अमित शहा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही टीका केली. पंजाबमध्ये नशेचा प्रश्न केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून, तो तरुणांचे भविष्य आणि अनेक कुटुंबांच्या अस्तित्वाशी संबंधित असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. अमली पदार्थांच्या जाळ्याला आळा घालण्यासाठी तस्करांवर कारवाई, पुरवठा साखळीचा पर्दाफाश आणि व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन या सर्व बाबींवर एकाच वेळी लक्ष देणे आवश्यक आहे. ड्रग्ज माफियांना पाताळातून शोधून काढण्याच्या अमित शाह यांच्या इशाऱ्यामुळे पंजाबमधील अमली पदार्थांविरोधातील कारवाईबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. आता या घोषणेचे प्रत्यक्ष कारवाईत किती रूपांतर होते, तस्करीच्या जाळ्यातील प्रमुख आरोपींवर कोणती पावले उचलली जातात आणि नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी कोणती प्रभावी उपाययोजना केली जाते, याकडे पंजाबसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka