Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ड्रोनपासून रणगाड्यापर्यंत. बेल्जियमसोबतच्या करारांमधून स्वदेशी उत्पादनाला चालना

ड्रोनपासून रणगाड्यापर्यंत. बेल्जियमसोबतच्या करारांमधून स्वदेशी उत्पादनाला चालना

NEWS डंका 1 month ago

भारताकडून १० संरक्षण करारांवर शिक्कामोर्तब

भारत आणि बेल्जियमने संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मोठी चालना देत १० महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान हे करार करण्यात आले.

यामध्ये दारुगोळा, रॉकेट, नौदलातील सुरुंगविरोधी यंत्रणा, ड्रोनविरोधी तंत्रज्ञान, रणगाड्यांसाठी प्रणाली आणि हवाई संरक्षणाशी संबंधित तंत्रज्ञानाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानला लष्करी उपकरणे किंवा संरक्षण तंत्रज्ञान पुरवण्याबाबत बेल्जियम पाकिस्तानसोबत सहकार्य करणार नसल्याची ग्वाही दिल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बेल्जियमचे संरक्षण आणि परराष्ट्र व्यापारमंत्री थियो फ्रांकेन यांची स्वतंत्र भेट घेतली. दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी उच्चस्तरीय बैठका, लष्करी प्रशिक्षण, अधिकाऱ्यांची देवाणघेवाण आणि क्षमता वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्याबाबतच्या करारांवरही स्वाक्षरी केली. यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांची देवाणघेवाण, प्रशिक्षण, संशोधन आणि विकास, संयुक्त सराव, चर्चासत्रे तसेच सागरी सुरक्षेतील सहकार्याचा समावेश आहे. भविष्यातील संरक्षण सहकार्यासाठी औद्योगिक आराखडा तयार करण्याचेही दोन्ही देशांनी ठरवले आहे.

या करारांपैकी एक महत्त्वाचा करार Thales Belgium आणि Kalyani Strategic Systems यांच्यात झाला आहे. याअंतर्गत बेल्जियमचे ७० मिमी रॉकेट भारतातच जोडणी करून तयार केले जाणार आहे. भारतात पूर्णपणे तयार होणारे पहिले रॉकेट २०२७च्या सुरुवातीला तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारताची स्थानिक संरक्षण उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

बेल्जियमची New Lachaussée आणि भारताची Tembo Classic Engineering यांच्यात दारुगोळा निर्मितीसाठी करार झाला आहे. याअंतर्गत दोन प्रकारच्या दारुगोळ्यासाठी संपूर्ण उत्पादन व्यवस्था उभारली जाणार असून, आणखी दोन प्रकारांसाठी आवश्यक साधनेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे १० कोटी राऊंड्स असेल. या प्रकल्पाची किंमत सुमारे ५ कोटी युरो असून, उत्पादन व्यवस्था २०२८-२९पर्यंत उभारण्याचे नियोजन आहे.

Exail Belgium आणि लार्सन अँड टुब्रो यांच्यातही महत्त्वाचा करार झाला आहे. भारताच्या नौदलासाठी तयार होणाऱ्या माइन-काउंटरमेझर जहाजांसाठी समुद्रातील सुरुंग शोधणे, त्यांची ओळख पटवणे आणि ते निष्क्रिय करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारताच्या या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ जहाजांचा समावेश आहे. भविष्यात ही संख्या ५९ जहाजांपर्यंत वाढू शकते. पाण्याखालील रोबोटिक्स, स्वयंचलित सागरी यंत्रणा आणि बंदरे, पाइपलाइन तसेच समुद्राखालील डेटा केबल्सच्या सुरक्षेसाठीही सहकार्य वाढवण्यावर भर आहे.

John Cockerill Defense आणि लार्सन अँड टुब्रो यांच्यात झालेल्या करारानुसार भारताच्या 'झोरावर' हलक्या रणगाड्यासाठी बेल्जियमची कंपनी तोफेचा टॉवर उपलब्ध करून देणार आहे. उंच पर्वतीय भागात वापरण्यासाठी 'झोरावर' विकसित केला जात आहे. या करारामुळे भारताच्या नव्या रणगाडा कार्यक्रमात बेल्जियमच्या कंपनीचा सहभाग वाढणार आहे.

बेल्जियमची Sol.One कंपनी भारतातील DGVK Enterprisesसोबत ड्रोनविरोधी प्रणालीच्या क्षेत्रात सहकार्य करणार आहे. 'Saboteur' ड्रोन आणि 'Buzzkill' तसेच 'Hitchhiker' इंटरसेप्टर प्रणाली भारतीय बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे. भारतीय लष्कराने या प्रणालींबाबत माहिती मागवली असून, त्यांच्या चाचण्या होण्याची शक्यता आहे. याशिवाय OIP Sensor Systems आणि India Optel यांच्यात 'अर्जुन' मुख्य रणगाड्यासाठी इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली विकसित करण्याबाबत करार झाला आहे. 'अर्जुन' रणगाड्याच्या भविष्यातील सुधारणा आणि नव्या लढाऊ वाहनांच्या विकासासाठी या सहकार्याचा उपयोग होऊ शकतो.

टीकाकारांनी समान गोष्टींची तुलना करायला हवी!

बलात्कार प्रकरणे मिटवण्यासाठी ५ कोटी? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह पत्नीवर आरोप

'झोरावर' टँक ते हरित अमोनिया; भारत-बेल्जियम भागीदारीचे नवे पर्व

यासिन मलिकचे सरला भट हत्या प्रकरणाला आव्हान नाही!

बेल्जियमची Octave कंपनी भारताच्या काही हवाई संरक्षण कार्यक्रमांसाठी दृश्यांकन सॉफ्टवेअर पुरवत आहे. आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत हे सहकार्य आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच बेल्जियमची Anglo Belgian Corporation आणि Kirloskar Oil Engines यांच्यातही चर्चा सुरू आहे. भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी ६ मेगावॅट क्षमतेच्या सागरी डिझेल इंजिनच्या विकासासाठी बेल्जियमच्या कंपनीच्या तांत्रिक अनुभवाचा उपयोग करण्याचा विचार आहे.

या १० करारांमुळे भारत-बेल्जियम संरक्षण संबंध केवळ उपकरणांच्या खरेदीपुरते मर्यादित न राहता भारतात उत्पादन, तंत्रज्ञान सहकार्य आणि संयुक्त विकासाच्या दिशेने पुढे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेल्जियमच्या १५ कंपन्यांचे प्रतिनिधी या दौऱ्यात सहभागी झाले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka