मित्र जखमी, आरोपी अटकेत
मुंबई : मुलुंड परिसरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला २४ तासांत अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी आशिष गौतम बनसोडे (वय २१, रा. बदलापूर पूर्व) यांची पूर्वीपासून ओळख होती. बुधवारी (दि. २५ मार्च २०२६) सकाळी सुमारे ९ वाजता ही मुलगी मुलुंड येथे कॉलेजला आली असता आरोपी तेथे आला.
मोदी-जयशंकर यांनी उठवला दोन दलालांचा बाजार…
… आणि लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने सौदी अरेबियावरून घेतला यू-टर्न
यावेळी आरोपीने मुलीच्या पाठीमागून गळ्यात हात टाकून 'तू माझ्याशी का बोलत नाहीस?' अशी विचारणा करत तिच्यावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीचा मित्र मध्ये पडल्याने कोयत्याचा वार त्याच्या मानेच्या मागील बाजूस लागून तो जखमी झाला.
यानंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व शिवीगाळ करून भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह भारतीय शस्त्र कायदा व मुंबई पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आरोपीविरुद्ध यापूर्वीही बदलापूर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रकरणासह इतर गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.

