जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने शुक्रवारी जपानचा पराभव करत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.
या सामन्यानंतर भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ऋचा घोष हिने जपानमधील संघाच्या वास्तव्यासंदर्भातील अनुभव सांगितला.
एशियन गेम्सच्या आयोजनाबाबत काही संघांकडून सोशल मीडियावर व्यवस्थेतील त्रुटींबाबत चर्चा होत असताना, भारतीय संघाला मात्र जपानमध्ये कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नसल्याचे ऋचा घोषने स्पष्ट केले.
जपानविरुद्धच्या विजयानंतर आयएएनएसशी बोलताना ऋचा म्हणाली, 'आम्हाला आतापर्यंत कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागलेला नाही. हा आमच्यासाठी एक नवीन अनुभव आहे. येथे इतर खेळाडूंनाही भेटता येते, त्यांचे सामने पाहता येतात आणि अनुभवांची देवाणघेवाण करता येते. एशियन गेम्स आम्हाला आवडतात, कारण अनेक खेळांचे सामने एकाच ठिकाणी सुरू असतात. त्यामुळे इतर खेळांतील सहभागी खेळाडूंना भेटण्याची संधी मिळते. मला वाटते, ही खूप चांगली गोष्ट आहे.'
जपानमध्ये भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या चाहत्यांचेही ऋचा घोषने आभार मानले. 'आम्हाला पाठिंबा देण्यासाठी चाहते प्रत्येक ठिकाणी येतात. त्यामुळे मी त्यांना सलाम करते. येथे येऊन आमच्यासाठी जल्लोष करणे आणि आम्हाला पाठिंबा देणे खरोखरच खूप छान वाटते,' असे ऋचाने सांगितले.
जपानला पहिल्यांदाच भेट देण्याचा अनुभवही ऋचाने शेअर केला. ती म्हणाली, 'खरंच खूप छान वाटत आहे. मी येथील वातावरण आणि हवामानाचाही आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस पडत होता. सामन्यादरम्यान पाऊस आला नाही, याचा आनंद आहे. या दौऱ्याचा आनंद घेणार असून जपानमध्ये फिरण्याचाही प्रयत्न करणार आहे.'
भारतीय महिला संघासमोर आता उपांत्य फेरीत बांगलादेशचे आव्हान असणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याच्या तयारीबाबत ऋचा म्हणाली, 'आम्ही यापूर्वी एशिया कपमध्येही खेळलो आहोत, त्यामुळे आमच्यासाठी हे सामान्य आहे. आम्हाला आमच्या ताकदीची जाणीव आहे आणि आम्ही त्यावरच विश्वास ठेवू. पुढचा सामना कोणाविरुद्ध आहे, याचा आम्ही फार विचार करत नाही. सामन्याच्या दिवशी आम्ही सर्वोत्तम कामगिरी कशी करू शकतो, यासाठी स्वतःला तयार करत आहोत.'
एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना रंगणार असून, भारतीय महिला संघाचे लक्ष्य अंतिम फेरीत धडक मारण्याचे असेल.

