Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'गर्वाने निरोप घेतोय'!

'गर्वाने निरोप घेतोय'!

NEWS डंका 1 month ago

ओटामेंडीने घेतला निवृत्तीचा निर्णय

र्जेंटिनाचा अनुभवी आणि स्टार बचावपटू निकोलस ओटामेंडी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 'मी अभिमानाने निरोप घेत आहे,' असे सांगत ३८ वर्षीय ओटामेंडीने तब्बल १७ वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीचा शेवट केला.

ओटामेंडीने अर्जेंटिनासाठी १३९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने संघाला एक फिफा विश्वचषक आणि दोन कोपा अमेरिका विजेतेपदे मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चार फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणारा तो देशातील सर्वात यशस्वी बचावपटूंमध्ये गणला जातो.

निवृत्तीची घोषणा करताना ओटामेंडीने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहिला. तो म्हणाला, 'आज माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण शब्द लिहित आहे. लहानपणापासून अर्जेंटिनाची जर्सी परिधान करण्याचे स्वप्न पाहिले होते. ही जर्सी घालणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. प्रत्येक वेळी मी पूर्ण ताकद, समर्पण आणि अभिमानाने देशासाठी खेळलो.'

ओटामेंडीचा अर्जेंटिनाकडून अखेरचा सामना फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत झाला. या सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव केला. अंतिम निकाल निराशाजनक असला तरी संघाच्या प्रयत्नांचा त्याला अभिमान असल्याचे त्याने स्पष्ट केले.

तो पुढे म्हणाला, 'नशिबाने माझा शेवटचा सामना विश्वचषक अंतिम फेरीत लिहून ठेवला होता. निकाल आमच्या मनासारखा लागला नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सर्वस्व पणाला लावले. मी मैदानावर माझ्याकडून शक्य ते सर्व दिले. या जर्सीचा मान राखण्यासाठी कधीही कसूर केली नाही.'

ओटामेंडीच्या निवृत्तीमुळे अर्जेंटिनाच्या सुवर्णपिढीतील आणखी एका दिग्गज खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka