Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गावागावांतून शोधणार भारताचे भावी चॅम्पियन!

गावागावांतून शोधणार भारताचे भावी चॅम्पियन!

मोदींची 'प्रतिभा खोज' मोहिमेची घोषणा

स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली.

भारतात 'प्रतिभा खोज' अभियान राबवून देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवंत खेळाडू शोधले जाणार आहेत. ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील क्रीडा प्रतिभा शोधून त्यांना प्रशिक्षण देत देशातील सर्वोत्तम खेळाडू घडवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

मोदी म्हणाले, 'जो खेलेगा वो खिलेगा. भारत आता क्रीडा विश्वात आपली जागा निर्माण करत आहे. क्रीडा व्यासपीठावर भारताचे राष्ट्रगीत ऐकू येते आणि तिरंगा फडकताना दिसतो.'

भारत २०३६ च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी मजबूत दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे मोदींनी सांगितले. मात्र ऑलिम्पिकमधील सुमारे ४० क्रीडा प्रकार आणि ३२५ ते ३५० स्पर्धांपैकी जवळपास दोन तृतीयांश स्पर्धांमध्ये भारत पात्र ठरत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याच पार्श्वभूमीवर देशातील तरुणांना या खेळांकडे वळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'गावागावांत, शहराशहरांत आणि शाळा-शाळांमध्ये ५ ते १५ वर्षांच्या मुलांमधील प्रतिभा शोधण्यासाठी 'प्रतिभा खोज' अभियान राबवले जाईल. प्रतिभेची ओळख करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि देशातील श्रेष्ठ खेळाडू म्हणून विकसित केले जाईल,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताच्या क्रीडा प्रगतीचा उल्लेख करताना मोदींनी TOPS योजना, खेलो इंडिया गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, विंटर गेम्स आणि बीच गेम्सचा उल्लेख केला. यासोबतच क्रीडा पायाभूत सुविधा, कोचिंग, स्पोर्ट्स मेडिसिन आणि क्रीडा पोषणाच्या क्षेत्रातही भारत वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत २०३० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवणार असल्याचे मोदींनी सांगितले. त्याचबरोबर २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला.

पदकांची संख्या वाढत असताना आता पुढचे लक्ष्य केवळ सहभागी होणे नव्हे, तर ज्या क्रीडा प्रकारांत भारत मागे आहे, तिथे नव्या प्रतिभेला संधी देऊन जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka