श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने मालिकेतील युवा खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. विशेषतः देवदत्त पडिक्कल आणि मानव सुथार यांच्या प्रभावी कामगिरीचे गिलने कौतुक करताना, दुसरा कसोटी सामना विजयाच्या स्थितीत असतानाही अनिर्णित राहिल्याची निराशा व्यक्त केली.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत साई सुदर्शनच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने दमदार कामगिरी केली. त्याने मालिकेत २ शतकांसह एकूण ३२८ धावा केल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 'एक्स'वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गिलने पडिक्कलच्या फलंदाजीचे विशेष कौतुक केले.
गिल म्हणाला, 'माझ्या मते ही आमच्यासाठी खूप चांगली मालिका होती. मालिकेत अनेक सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. सर्व युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, हे पाहून आनंद होतो.'
पडिक्कलच्या कामगिरीबाबत गिल म्हणाला, 'एकदा फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावला की त्याने त्याचा पूर्ण फायदा उठवायला हवा, असे आपण नेहमी म्हणतो. देवदत्तने ते करून दाखवले. ही आमच्यासाठी खूप सकारात्मक बाब आहे. मालिकेत त्याची फलंदाजी पाहणे खरोखरच आनंददायी होते. यातून त्याची मानसिकता दिसून येते आणि ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.'
डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने मालिकेत १६ बळी घेतले. गाले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने १६५ धावांनी मिळवलेल्या विजयात सुथारने एका सामन्यात १० बळी घेत शानदार कामगिरी केली.
सुथारच्या कामगिरीचे कौतुक करताना गिल म्हणाला, 'त्याने आमच्यासाठी शानदार कामगिरी केली आहे. मला वाटते की भविष्यात तो भारताच्या फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळू शकतो. या सामन्यात आणि पहिल्या सामन्यातही त्याची गोलंदाजी पाहणे खूप चांगले होते. तो जेव्हा गोलंदाजीला येतो, तेव्हा तो संधी निर्माण करून आपल्याला बळी मिळवून देईल, असे वाटते. त्याने पुढेही अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षा आहे.'
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयाच्या मजबूत स्थितीत होता. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत झुंज देत सामना अनिर्णित राखला. त्यामुळे गिलने निराशा व्यक्त केली.
'या मालिकेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. आम्ही चांगला खेळ केला. अर्थात, या सामन्यात आम्हाला अपेक्षित निकाल मिळाला नाही. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर आम्हाला सामना जिंकू, अशी अपेक्षा होती. मात्र, श्रीलंकेने या तीन दिवसांत ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याचे श्रेय त्यांना द्यायला हवे,' असे गिल म्हणाला.
'कधीकधी प्रतिस्पर्धी संघाकडूनही शिकायला हवे. त्यांनी त्यांच्या रणनीतीची योग्य अंमलबजावणी केली. आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका आमच्यासाठी चांगली ठरेल, अशी आशा आहे,' असेही गिलने सांगितले.

