Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हेटमायर-रदरफोर्डची तुफानी फटकेबाजी

हेटमायर-रदरफोर्डची तुफानी फटकेबाजी

NEWS डंका 1 month ago

वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडवर २ विकेट्सने थरारक विजय

शिमरॉन हेटमायर आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा २ विकेट्सने पराभव करत मालिकेचा शेवट विजयाने केला.

केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात २६९ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने ४७.३ षटकांत ८ गडी गमावून पार केले. मात्र, या पराभवानंतरही न्यूझीलंडने पाच सामन्यांची मालिका ३-२ अशी आपल्या नावावर केली.

२६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात दमदार झाली. अकीम ऑगस्टे (३४) आणि जस्टिन ग्रीव्ह्स (२२) यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कीसी कार्टी (२०) आणि कर्णधार शाय होप (३९) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, १२३ धावांवर चार विकेट्स गमावल्यानंतर वेस्ट इंडिज अडचणीत सापडला.

यावेळी शेरफेन रदरफोर्ड आणि शिमरॉन हेटमायर यांनी जबाबदारी स्वीकारत पाचव्या विकेटसाठी ९५ धावांची निर्णायक भागीदारी केली. रदरफोर्डने ६४ चेंडूत ६१ धावा करत दोन चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी केली. दुसऱ्या बाजूला हेटमायरने नाबाद ६९ धावांची संयमी पण आक्रमक खेळी साकारत संघाला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवले. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि जेडन लेनॉक्स यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, मात्र त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही.

त्याआधी फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ९ बाद २६८ धावा उभारल्या. हेन्री निकोल्स (१०) लवकर बाद झाल्यानंतर विल यंग (५६) आणि निक केली (६४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करत डाव सावरला. टॉम लॅथमनेही ७१ चेंडूत ६९ धावांची उपयुक्त खेळी केली.

वेस्ट इंडिजकडून १९ वर्षीय विटेल लॉव्स आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

अखेर हेटमायरच्या शांत, संयमी आणि विजयी खेळीमुळे वेस्ट इंडिजने सामना २ विकेट्सने जिंकला. मात्र, मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतील विजयाच्या जोरावर न्यूझीलंडने मालिका ३-२ अशी खिशात घातली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka