भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
इराण युद्धानंतर पश्चिम आशियातील तणाव कमी होऊ लागला असला, तरी त्याचे आर्थिक पडसाद अजूनही उमटत आहेत. विशेषतः दुबईच्या रिअल इस्टेट बाजारावर या संघर्षाचा मोठा परिणाम झाला असून, भारतीय गुंतवणूकदारांनी ही परिस्थिती संधी म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे.
युद्धकाळात गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाल्याने दुबईतील मालमत्ता व्यवहारांमध्ये सुमारे ८० टक्क्यांपर्यंत घट झाली होती. त्यानंतर अनेक प्रकल्पांतील घरांच्या किंमती १० ते १५ टक्क्यांनी घसरल्याने भारतीय गुंतवणूकदार पुन्हा मोठ्या प्रमाणावर दुबईकडे वळत आहेत.
दुबईतील रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, बाजारात सध्या 'बायिंग ऑपर्च्युनिटी' निर्माण झाली आहे. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणारे भारतीय, रशियन, चिनी आणि स्थानिक अमिराती नागरिक कमी दरात मालमत्ता खरेदी करत आहेत. युद्धामुळे युरोपीय गुंतवणूकदार आणि पर्यटकांची संख्या घटल्याने मागणी कमी झाली होती, त्यामुळे अनेक विकासकांनी आकर्षक ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्या आहेत.
ट्रम्पांची मेम कॉईनमधून हजारो कोटींची कमाई
हायटेक पद्धतीने फॉर्च्युनर चोरणारे आंतरराज्यीय रॅकेट उघड
भारतीय गुंतवणूकदार आधीपासूनच दुबईच्या रिअल इस्टेट बाजारातील सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी आहेत. भाड्यावरील चांगला परतावा, करसवलती, जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि भारतीयांसाठी तुलनेने सोपी गुंतवणूक प्रक्रिया यामुळे दुबई कायमच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. आता किंमती कमी झाल्याने अनेक उच्च उत्पन्न गटातील भारतीय आणि एनआरआय भविष्यातील वाढ लक्षात घेऊन मालमत्ता खरेदी करत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युद्धानंतरची परिस्थिती हळूहळू स्थिर होत असून शांतता टिकली तर दुबईचा मालमत्ता बाजार पुन्हा वेगाने सावरू शकतो. त्यामुळे सध्याच्या घसरलेल्या किंमती भविष्यात चांगला परतावा देऊ शकतात. मात्र, भू-राजकीय परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्थिर नसल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी प्रकल्पाची विश्वासार्हता, विकासकाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि दीर्घकालीन बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

