Dailyhunt
इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या ४१ विद्यार्थिनींचा मृत्यू

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या ४१ विद्यार्थिनींचा मृत्यू

NEWS डंका 2 months ago

निरपराधांचा बळी — मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद

ध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचा भडका उडाला आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्त कारवाई करत इराणमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईचा उद्देश इराणच्या लष्करी तळांना आणि रणनीतिक यंत्रणांना लक्ष्य करणे असा सांगितला जात असला, तरी या हल्ल्यांमध्ये निरपराध नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दक्षिण इराणमधील मिनाब शहरात असलेल्या मुलींच्या शाळेवर झालेल्या स्फोटात किमान ४० विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर ४५ हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था 'इरना'ने ही माहिती दिली. जखमी विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

इस्रायल-ईराण तणावामुळे शेअर बाजार हादरणार?

जम्मू-काश्मीरचे खेळाडू कौतुकास पूर्णपणे पात्र

सोन्यात स्थिरता, चांदी २,८४,९०० रुपयांवर

मिनाब परिसरात इराणच्या शक्तिशाली लष्करी संघटनेचा, म्हणजेच 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'चा तळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हल्ल्याचे लक्ष्य हे लष्करी ठिकाण होते, असा दावा अमेरिकन आणि इस्रायली सूत्रांकडून करण्यात येत आहे. मात्र शाळेवर झालेल्या हल्ल्यामुळे ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरी भागात अशा प्रकारे हल्ले होणे हे आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप इराणने केला आहे.

हल्ल्यानंतर राजधानी तेहरानसह इस्फहान आणि कोम या शहरांमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. काही भागांमध्ये हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले असून सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. इराणने या कारवाईला 'उघड आक्रमण' म्हणत कठोर प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या हल्ल्याचा बदला घेतला जाईल आणि अमेरिका तसेच इस्रायलच्या हितसंबंधांना लक्ष्य केले जाईल.

या घटनेमुळे संपूर्ण मध्य पूर्वेत अस्थिरता वाढली आहे. अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले असून परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी कूटनीतिक हालचाली सुरू झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि शाळेवरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निरपराध विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे हा संघर्ष केवळ लष्करी पातळीवर मर्यादित राहिलेला नाही, तर तो गंभीर मानवीय संकटात परिवर्तित झाला आहे. आधीच तणावग्रस्त असलेल्या मध्य पूर्वेत या घटनेने आणखी धग पेटवली असून येत्या काही दिवसांत परिस्थिती कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka