अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवर
बिहारच्या जमुई जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तिच्या मित्रासोबत झालेल्या कथित छेडछाड व मारहाणीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदन यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी आरोपीला पकडण्यासाठी केलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणातील आरोपींचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण ७ आरोपींची ओळख पटली आहे. नंदन यादव याच्यासोबत आणखी एका आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या दुसऱ्या आरोपीची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. यापूर्वी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असून, प्रकरणात अल्पवयीन पीडितेची ओळख उघड होईल अशा पद्धतीने व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे. अशा प्रकारे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सुमारे १२० समाजमाध्यम खात्यांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित झाल्याने प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. पोलिसांनी नागरिकांना अल्पवयीन पीडितेची ओळख उघड करणारा व्हिडिओ पुढे प्रसारित करू नये, असे आवाहन केले आहे.
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पतंग उडवणाऱ्या मुलीच्या घरावर एटीएसचा छापा
पोलीस असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला घातली गोळी
साहिलला परीक्षागृहातून बाहेर नेल्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद
छत्रपती संभाजीनगरमधून ४,७६५ किलो भेसळयुक्त 'मावा' जप्त
संबंधित घटना १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली, जेव्हा दोघे पीडित जमुई येथील जवळच्या हिल स्टेशनवरून परत येत असताना एका गटाने त्यांना थांबवले. त्यांना शिवीगाळ केली आणि गाडीवरून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा पाठलागही करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. या फुटेजमध्ये कथितरित्या मुलीचा एका गटाकडून छळ आणि मारहाण होत असल्याचे, तसेच मुलाचाही शारीरिक छळ होत असल्याचे दिसत होते.
पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या दोन दिवसांनंतर, रविवारपर्यंत दोन्ही पीडितांनी त्यांच्याकडे कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी फुटेजमध्ये दिसणाऱ्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने त्या किशोरवयीन मुलांचा शोध घेतला.

