२०२६ ज्युनियर महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघाने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत जपानचा तब्बल ७-० असा एकतर्फी पराभव केला. या शानदार विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.
भारताने एलीट पूलमधील तीनही सामने जिंकून नऊ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने याआधी दक्षिण कोरियाचा ४-१ आणि मलेशियाचा ११-१ असा पराभव केला होता.
जपानविरुद्धच्या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर वर्चस्व राखले. पाचव्या मिनिटाला कृष्णा शर्माने गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर नवव्या मिनिटाला जपानच्या बचावपटूकडून सर्कलमध्ये फाऊल झाल्याने भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. सुप्रियाने कोणतीही चूक न करता गोल करत भारताची आघाडी २-० केली.
पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस पूर्णिमा यादवने १४व्या मिनिटाला फील्ड गोल करत भारताची आघाडी ३-० अशी केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने प्रतिआक्रमणाचा प्रयत्न केला; मात्र भारतीय बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत भारत ३-० ने आघाडीवर राहिला.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा वेग वाढवला. गीता यादवने ४१व्या आणि ४५व्या मिनिटाला सलग दोन गोल करत भारताची आघाडी ५-० वर नेली. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात पूर्णिमा यादवने पुन्हा गोल करत आपला दुसरा गोल नोंदवला आणि भारताला ६-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
शेवटच्या क्वार्टरमध्येही भारताचा आक्रमक खेळ कायम राहिला. ५०व्या मिनिटाला सानिका चंद्रकांत मानेने गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेर भारताने जपानचा ७-० असा दणदणीत पराभव केला.
भारताचा एलीट पूलमधील शेवटचा सामना बुधवारी चीनविरुद्ध होणार आहे. चीनने आतापर्यंत दोन सामन्यांत सहा गुण मिळवले असून, भारत-चीन सामन्यातून पूलमधील अव्वल स्थान निश्चित होणार आहे.

