Dailyhunt
जिंकलो रे! ट्रम्पना का करावी लागली ही घोषणा

जिंकलो रे! ट्रम्पना का करावी लागली ही घोषणा

NEWS डंका 1 month ago

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराण विरुद्धच्या युद्धात आम्ही जिंकलो, अशी घोषणा करावी लागली. दुसरा पर्याय सध्या तरी त्यांच्याकडे दिसत नाही. इराणच्या दिशेने काही काळापूर्वी नौदलाचा ताफा रवाना करताना इतकी कडवी झुंज मिळेल अशी अपेक्षा त्यांनी केली नसावी. इराणला लोळवता आले नाही, आखातातील अमेरिकेच्या मित्र देशांच्या आकाशात गडगडाट सुरू आहे.

इराणमध्ये व्हीएतनामची पुनरावृत्ती होण्याची शक्यता स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे आखातातून काढता पाय घ्यायचा असेल तर जिंकलो अशी घोषणा करण्या पलिकडे ट्रम्प यांच्या हाती काहीही दिसत नाही.
एका शपथविधी सोहळ्यात भाषण ठोकताना ट्रम्प यांनी युद्धात आम्ही जिंकलो आहोत, अशी गोड बातमी अमेरिकी जनतेला दिली. त्यासाठी तर्कही दिले. 'आम्ही त्यांचे नौदल संपवले, त्यांचे हवाई दल मोडीत काढले. संपर्क संपवला, खरे तर सगळेच संपवले. मला वाटते आम्ही हे सगळे लवकरच संपवू. सध्या आमच्यात वाटाघाटी सुरू आहेत', असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या घोषणेमुळे शहाबाज शरीफ यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये थोबाड फुटल्यानंतर त्यांनीही विजयी भाषण ठोकले होते. पाकिस्तानमध्ये विजयी मोर्चे निघाले होते. ट्रम्प तेच करतायत. परंतु ते म्हणाले आता आम्ही हे संपवू आणि सगळे काही संपले अशी शक्यता दिसत नाही.

पाकिस्तानने या प्रकरणी मध्यस्तीची तयारी दाखवली. दोन्ही देशांचे प्रतिनिधी पाकिस्तानमध्ये भेटून वाटाघाटी करू शकतील असा प्रस्ताव दिला. शहाबाज शरीफ यांनी तशी पोस्ट केली. तीच पोस्ट ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवर रिपोस्ट केली. याचा अर्थ स्पष्ट आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा स्वत:चा टॉयलेट पेपर सारखा वापर करू द्यायला तयार आहे. आमचा वापर टॉयलेट पेपर सारखा केला जातो, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्बाजा आसिफ यांनी यापूर्वीच दिलेली आहे.वापर केल्यानंतर टॉयलेट पेपर डस्टबिनमध्ये टाकला जातो, हे त्यांनाही माहिती आहे.

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर उद्या बालेन्द्र शाह यांचा शपथविधी

पंतसाठी युवराज ठरणार गेमचेंजर?

गौतम गंभीर यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण

अमेरिकेच्या Lincoln युद्धनौकेवर क्रुझ दागल्याचा इराणचा दावा
मध्यस्तीसाठी पाकिस्तानच का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. त्यांना सांगणे गरजेचे आहे, हाच पाकिस्तानचा धंदा आहे. मध्यस्ती करायची आणि दोन्ही बाजूचे कमिशन खायचे. ट्रम्प यांनाही मांडवली करण्यासाठी त्यांचाच एखादा पपलू लागणार, हे काम ते ब्लादमीर पुतीन, शी जिनपिंग किंवा नरेंद्र मोदींना सांगू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना वास्तवमधल्या सुलेमान सारखा एखादा मांडवली बादशहा हवा आहे. त्या भूमिकेत शिरण्याची तयारी शाहबाज शरीफ यांनी दाखवली आहे.

ट्रम्प यांनाही पाकिस्तानला मोठेपणा द्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानचे पडेल फिल्ड मार्शल आसीम मुनीर यांना फोन केला. पन्नास किलोचे तांदळाचे पोते आणि तांदळाचा कंटेनर एकाच तागडीत तोलू असे त्यांना वाटते आहे.

मोदींना फोन करून भागणार नाही, म्हणून ट्रम्प यांनी या युद्धाच्या धामधुमीत अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी ऑफ डिफेन्स पॉलिसी एलब्रिज कोल्बी यांना भारतात पाठवले. कोल्बी त्यांनी परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांची भेट घेतली. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाली असणार हे उघड आहे. सीआयएचा अटकेत असलेला हस्त मॅथ्यू व्हॅनडीक याच्या संदर्भातही चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे. पर्यटन व्हीसावर भारतात येऊन ईशान्य भारतातून म्यानमारमध्ये येजा करणे आणि म्यानमारच्या बंडखोरांना प्रशिक्षण देणे हे धंदे करताना त्याला सहा युक्रेनियन साथीदारांसह व्हॅनडीकला अटक झालेली आहे. या अटकेमुळे अमेरिकेला मिर्ची लागणे स्वाभाविक आहे.

इराणी जनतेवर कृपा म्हणून ट्रम्प युद्ध थांबवण्याच्या मानसिकतेत आलेले नाहीत. युद्ध बुडाशी येत असल्याचे त्यांना स्पष्टपणे दिसते आहे. अमेरिकी ट्रेजरी डिपार्टमेंट जाहीर केलेले २०२४-२५ चे आकडे अमेरिकी नागरिकांना धक्का देणारे आहे. अमेरिका दिवाळखोरीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.
संपत्तीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण भरमसाठ वाढले आहे. ट्रेजरी डिपार्टमेंटने जाहीर केलेले आकडे धक्कादायक आहेत. ६.०६ ट्रिलियनच्या मालमत्ता आणि ४७.७८ ट्रिलियनची देणी ही अमेरिकेची परिस्थिती आहे. अर्थकारण उतरणीला लागलेले आहे. अर्थसंकल्पीय तूट १.९ ट्रिलियन डॉलर. कर्जाचे व्याज फेडताना अमेरिका मेटाकुटीला आली आहे. कर्जामुळे कर्ज वाढते आहे. १८ मार्च रोजी जाहीर कऱण्यात आलेला कर्जाचा आकडा ३९ ट्रिलियन झालेला आहे. ४० ट्रिलियनचा आकडा फार दूर नाही. इराण युद्धासाठी आतापर्यंत झालेला प्रत्यक्ष खर्च १८ अब्ज पेक्षा जास्त आहे, असा अधिकृत आकडा सांगितला जात असला तरी गेल्या तीन आठवड्यात प्रत्यक्षात आलेला खर्च ६० ते १३० अब्ज असावा. युद्ध पाच आठवड्यांपेक्षा जास्त चालले त हा खर्च १७५ अब्जपर्यंत आणि आठ आठवडे चालले तर २५० अब्जपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

युद्ध महाग पडणार अशी लक्षणे दिसू लागली असल्यामुळे ट्रम्प यांना आटोपते घ्यायचे आहे. 'खेळ संपला नाही, कारण मी जिंकलो नाही…' ही उक्ती फिरवून 'मी जिंकलो आहे, म्हणजे खेळ संपलेला आहे', या पद्धतीने जनतेच्या गळी उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अमेरिकी जनता हे मान्य करेल किंवा करणार नाही, परंतु ट्रम्प यांच्या दुर्दैवाने युद्ध संपवण्याचा निर्णय ते एकटे घेऊ शकत नाही. 'हे युद्ध कधी संपेल हे आम्ही ठरवू', असे आयआरजीसीने आधीच जाहीर केले आहे.

ट्रम्प यांना युद्ध संपवण्याचे वेध लागले आहेत. दोन्ही देशांच्या वाटाघाटी सुरू आहेत, असे त्यांनी जाहीर केले आहे. इराणने त्यांना पुन्हा एकदा तोंडावर पाडले आहे. हे वृत्त म्हणजे निव्वळ वावड्या असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. 'ट्रम्प यांची मानसिकता आता या पातळीवर आली आहे की ते स्वत:शीच वाटाघाटी करतायत', या शब्दात इराणच्या संयुक्त मिलिटरी कमांडचे प्रवक्ते इब्राहीम झुल्फीकारी यांनी ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

इराणला ट्रम्प यांच्यावर विश्वास नाही. गेल्या वर्षी वाटाघाटीचे गुऱ्हाळ लावून ट्रम्प यांनी बी-२ बॉम्बर पाठवून इराणवर हल्ला केला होता. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थीसाठी पुढे करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी जो १५ कलमी प्रस्ताव दिला आहे, तो ट्रम्प मान्य करण्याची शक्यता कमी आहे. त्यात अण्वस्त्र निर्मिती करणे तर दूरच, नागरी वापरासाठीही युरेनियम विकसित करायचे नाही, अशी अट आहे. विकसित केलेल्या युरेनियमचा साठा इंटरनॅशनल एटॉमिक एनर्जी एजन्सीकडे सोपवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ट्रम्प एवढे घायाकुतीला आले असताना इराण या अटी मान्य करण्याची शक्यता कमी आहे. ट्रम्प घायकुतीला आलेले आहेत, हे त्यांनी इराणला तेल विकण्यासाठी दिलेल्या सवलतीवरून उघड होते. इराणला ३० दिवसांची सवलत देण्याची दर्यादिली अमेरिका दाखवतो आहे, तीही न मागता, हे सूचक आहे. युद्ध थांबवण्यासाठी कोण उतावळा झाला आहे, हे स्पष्ट करणारे आहे.

इराणने युद्ध थांबवले तर ते सशर्त थांबणार आहे. युद्ध थांबवण्यासाठी इराणच्याही काही अटी घातल्या आहेत. त्यांना नुसकान भरपाई म्हणून ५०० अब्ज डॉलर्स हवे आहेत, पुन्हा हल्ला न करण्याची हमी हवी आहे. हे म्हणजे प्रेयसीने प्रियकराकडे आकाशीचा चंद्र मागण्यासारखे आहे. ही नुकसान भरपाई देणार कोण? अमेरिकेचा खिसाही रीकामा आहे. दोन्ही बाजूच्या अटी सध्या तरी अशक्य प्राय दिसत आहेत. कोणाला तरी माघार घ्यावी लागले. ती ट्रम्पच घेतील अशी शक्यता आहे. कारण इराणला बरबादीची चिंता नाही, अमेरिकेसाठी मात्र बरबादी हे दु:स्वप्न आहे.

इराणच्या स्वस्त ड्रोनने अमेरिकेला साफच वाकवले आहे. आपण जिंकलो आहोत, हे दाखवण्यासाठी आता ट्रम्प यांना अमेरिकेच्या सडकेवर विजयी जल्लोष साजरा करत मोर्चा काढावा लागणार आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka