शस्त्राचा धाक दाखवत व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप
पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यामध्ये पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे नेते इफ्तिखार अहमद उर्फ पप्पू यांना खंडणी उकळणे, शस्त्राचा धाक दाखवून धमकावणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा विविध गंभीर आरोपांप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इफ्तिखार अहमद यांना बुधवारी शेजारच्या पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील दुर्गापूरमधील बिरिंगी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ते बर्दवान नगरपालिकेच्या माजी नगरसेविका शेफाली बेगम यांचे पती आहेत. शेफाली बेगम यांनी गेल्या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
गुरुवारी इफ्तिखार अहमद यांना बर्दवान जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी सखोल चौकशीसाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, इफ्तिखार अहमद यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून बर्दवान रेल्वे स्थानक परिसर आणि शहरातील व्यापारी तसेच स्थानिकांकडून दीर्घकाळ खंडणी उकळल्याचा आरोप आहे. विरोध करणाऱ्यांना अवैध शस्त्रे दाखवून धमकावणे आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणे, अशीही त्यांच्यावर आरोप आहेत.
तपासादरम्यान २०१९ ते २०२६ या कालावधीत त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी तपासात समाविष्ट केली आहे. चौकशीदरम्यान त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बर्दवान दक्षिण मतदारसंघाचे माजी तृणमूल आमदार खोखन दास यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधांचा फायदा घेत इफ्तिखार अहमद यांनी मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली. या माध्यमातून मिळालेली रक्कम राज्यातील विविध भागांत गुंतवण्यात आल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, खंडणी रॅकेट आणि अवैध शस्त्रांच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या तपासात सहकार्य करण्याची तयारी इफ्तिखार अहमद यांनी दर्शविल्याचे पोलिसांनी सांगितले.
एअर इंडिया एक्सप्रेसकडून ओमान, कुवेतसाठीच्या उड्डाणांचा पुनरारंभ
भारत-जपानमध्ये संयुक्त संरक्षण सह-विकास प्रकल्प करार
ऑस्ट्रियातील भारताच्या राजदूतांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या पंचतंत्राच्या कथा
साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
या प्रकरणाची सुरुवात २६ मे रोजी दाखल झालेल्या एका लेखी तक्रारीतून झाली. तक्रारदार शिवशंकर चौधरी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर बर्दवान रेल्वे स्थानकाजवळील त्यांच्या दुकानावर हल्ला करून तोडफोड करण्यात आल्याचा आरोप केला होता. तक्रारीनुसार, त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. विरोध केल्यावर त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरात घुसून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्व बर्दवान जिल्हा पोलीस करत आहेत.

