Dailyhunt
कोहलीमध्ये अजून टेस्ट क्रिकेट बाकी होतं!

कोहलीमध्ये अजून टेस्ट क्रिकेट बाकी होतं!

NEWS डंका 1 month ago

विराट कोहलीने गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांच्या मते कोहलीमध्ये अजूनही टेस्ट क्रिकेट बाकी होते.

आता माजी फिरकीपटू आर. अश्विननेही यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, 'मी स्वतः विराटला सांगितलं होतं की त्याच्यात अजूनही टेस्ट क्रिकेट बाकी आहे.' मात्र, त्याचवेळी त्यांनी कोहलीच्या निर्णयाचा आदर करणेही महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

'तो निवृत्त झाला आहे आणि हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. विराटने नेहमीच संघाला प्राधान्य दिलं. त्याच्यासाठी संघ जिंकणं महत्त्वाचं होतं,' असे अश्विन म्हणाला. तरीही, कोहलीकडून अजून काही वर्षे टेस्ट क्रिकेट खेळले गेले असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२०२४-२५ चा ऑस्ट्रेलिया दौरा कोहलीसाठी कठीण ठरला होता. ऑफ-स्टंपबाहेरील चेंडूंवर त्याची कमजोरी स्पष्ट झाली होती. फॉर्म परत मिळवण्यासाठी त्याने रणजी ट्रॉफीतही खेळण्याचा प्रयत्न केला, पण अपेक्षित यश मिळालं नाही. वाढता दबाव आणि सततची चर्चेपासून दूर राहण्यासाठी त्याने टेस्ट क्रिकेटमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत १२३ टेस्ट सामन्यांत ९,२३० धावा केल्या असून त्यात ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोच्च स्कोर २५४ आहे. कर्णधार म्हणूनही त्याने भारताला टेस्ट क्रिकेटमध्ये मजबूत स्थान मिळवून दिलं.

दरम्यान, अश्विननेही २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. कोहली, अश्विन आणि रोहित शर्मा या तिघांनी जवळपास एकाच काळात टेस्ट क्रिकेट सोडल्याने भारतीय संघ व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

अश्विनच्या वक्तव्यामुळे एकच प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे — कोहलीमध्ये अजून क्रिकेट बाकी होतं का?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka