Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कुणी जमीन देता जमीन?

कुणी जमीन देता जमीन?

NEWS डंका 2 weeks ago

पंतला उत्तराखंडात घरासाठी जागाच मिळेना!'

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

दिल्लीहून आपल्या मूळ गावी उत्तराखंडमध्ये स्थलांतरित होण्यासाठी तो गेल्या काही वर्षांपासून योग्य जमीन शोधत असल्याचे पंतने म्हटले आहे.

पंतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मुख्यमंत्री धामी यांना टॅग करत लिहिले, 'हॅलो पुष्कर सिंह धामी सर, तुम्ही कसे आहात? उत्तराखंडचा मूळ रहिवासी असल्याने मला येथे येऊन बराच काळ झाला आहे. दिल्लीहून उत्तराखंडमध्ये स्थलांतरित होण्यासाठी मी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, राहण्यासाठी चांगली आणि मोठी जागा मिळत नाही.'

'मला माझे उत्तराखंड खूप आवडते. त्यामुळे जमीन खरेदी करण्यासाठी आपण माझी मदत करावी, ही विनम्र विनंती. कारण सध्या स्वच्छ आणि चांगली जमीन मिळणे खूप कठीण झाले आहे,' असेही पंतने म्हटले.

पंतने पुढे एका प्रलंबित जमीन प्रकरणाचाही उल्लेख केला. 'राज्याचा प्रचार-प्रसार करत असताना मला मिळायला हवी असलेली एक जमीनही अद्याप प्रलंबित आहे. सर्व काही मागे सोडून मला माझ्या मूळ ठिकाणी परत यायचे आहे. उत्तराखंडच्या विकासात योगदान देत माझ्या डोंगराळ भागातील लोकांसोबत राहायचे आहे,' असे त्याने सांगितले.

मुख्यमंत्री धामी यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करत पंतने म्हटले की, 'तीन वर्षे झाली आहेत, पण अद्याप जमीन मिळालेली नाही. तुमच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.'

ऋषभ पंतचा जन्म उत्तराखंडमधील रुडकी येथे झाला. क्रिकेट कारकिर्दीसाठी तो दिल्लीला गेला. सध्या पंत भारतीय संघासोबत श्रीलंकेत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

पंत गेल्या काही काळापासून खराब फॉर्म आणि फिटनेसच्या समस्यांशी झुंजताना दिसला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्याचे त्याचे लक्ष्य असेल. पंत भारताच्या वनडे आणि टी-२० संघातूनही बराच काळ बाहेर आहे. त्याने अखेरचा वनडे सामना ७ ऑगस्ट २०२४ रोजी, तर अखेरचा टी-२० सामना २८ जुलै २०२४ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka